6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, प्लंबरला 6 वर्षाचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 06:41 PM2022-04-10T18:41:52+5:302022-04-10T19:08:52+5:30
Pocso Case : गोविंद जाधव याला कल्याण येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी ६ वर्षे ११ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
कल्याण: सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गोविंद जाधव याला कल्याण येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी ६ वर्षे ११ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान त्याची ३७७ कलमान्वये दाखल असलेल्या आरोपातून निर्दाेष मुक्तता झाली आहे.
व्यवसायाने प्लंबर असलेल्या गोविंदने त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा मे २०१५ मध्ये बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून नोंदविण्यात आला होता. विनयभंग आणि अनैसर्गिक अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कल्याणच्या आधारवाडी कारागृहात होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक एफ.एम शेख यांनी तपास करून गुन्हयाचे दोषारोपपत्र पोक्सो न्यायालयात दाखल केले होते.
सरकारी पक्षाच्या वतीने वकील अश्विनी भामरे पाटील यांनी तर बचाव पक्षाच्या वतीने वकील आलिम शेख आणि तृप्ती पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षीदार, पुरावे या आधारे आरोपी जाधवला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रय} केल्याच्या गुन्हयात सहा वर्षे ११ महिन्याची कारावासाची शिक्षा पोक्सो न्यायालयाच्या न्या. संगीता पहाडे यांनी ठोठावली. मात्र अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा न्यायालयात सिध्द होऊ शकला नाही.