डॉक्टर असल्याची बतावणी करून सराफांना गंडा घालणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 07:11 PM2018-12-27T19:11:18+5:302018-12-27T19:14:22+5:30
पुन्हा अशाच प्रकारच्या फसवणुकीची घटना नौपाडा येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली होती. अशा प्रकारे डॉक्टर असल्याची बतावणी करून गंडा घालणाऱ्या ठगास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे - नौपाड्यातील स्टेशन परिसरात एका सराफा दुकानात अज्ञात व्यक्तीने फोन करून मी डॉक्टर स्वाती बोलत असून मला सोन्याच्या पाटल्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी माप घ्यायला माणसे पाठवा आणि सोबत काही सुट्टे पैसे देखील पाठवा अशी बतावणी करत 1 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या घटनेस आठवडा उलटत नाही. तोच पुन्हा अशाच प्रकारच्या फसवणुकीची घटना नौपाडा येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली होती. अशा प्रकारे डॉक्टर असल्याची बतावणी करून गंडा घालणाऱ्या ठगास नौपाडा पोलिसांनीअटक केली आहे.
पाचपाखाडी येथील सोने विक्रीचा व्यवसाय करणारे मुकेश दहिवाळ (33) यांना 29 एप्रिल रोजी सायंकाळी लँडलाईनवर एक कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या अज्ञात महिलेने मी आधार हॉस्पिटलमधून डॉ. स्वाती बोलत असून मला सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत अशी बतावणी केली. याच वेळी या अज्ञात महिलेने माझ्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटांचे एक लाख रुपयांच्या नोटांचे बंडल दिले असून मला सुट्टे पैसे पाहिजे आहेत. तुमचा माणूस बांगड्यांचे माप घ्यायला येईल त्यावेळी त्याच्यासोबत सुट्टे पैसे देखील पाठवा असे देखील सांगितले. फोनवरून बोलणाऱ्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुकेश दहिवाळ हे स्वतः 50 हजाराचे सुट्टे पैसे घेऊन आधार हॉस्पिटल येथे गेले असता संस्कार टॉवरजवळच्या लिफ्टनजीक एका अनोळखी इसमाने मुकेश यांना अडवून तुमच्याकडील रक्कम डॉक्टरांनी मला देण्यास सांगितली आहे, असे सांगून घेतली. रक्कम हातात मिळताच हा इसम फरार झाला. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुकेश यांनी नौपाडा पोलिसात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. दरम्यान या दोन्ही घटनेतील चोरटे एकाच टोळीतील असावेत असा पोलिसांना संशय आहे, असा पोलिसांना संशय होता. तसेच अशाच प्रकारची फसवणूक कळव्यात देखील झाली होती. म्हणून पोलीस बऱ्याच दिवसांपासून या टोळीच्या मागावर होते. अखेर नौपाडा पोलिसांना या फसवणुकीच्या घटनेतील आरोपीची माहिती मिळाली आणि त्यांनी या टोळीचा मुख्यसूत्रधार मनीष शशिकांत आंबेकर (40, राहणार- पळस्पे गाव नवी मुंबई व नालासोपारा) यास 14 डिसेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आशा प्रकारे नौपाडा, वागळे आणि कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 11 ठिकाणी फसवणूक केल्याची कबुली त्या ठगाने दिली. या भामट्याकडून 1 लाख 20 हजाराची रोकड व 5 लाख 80 हजाराचे दागिने असा एकूण 7 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी यांनी दिली. अटकेत असलेल्या भामट्याला अजून देखील काही व्यक्तींनी मदत केली असावी असा पोलिसांना संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.