वडाळ्यात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणारी दुकली अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:32 PM2018-10-15T21:32:25+5:302018-10-15T21:32:41+5:30
नारायण गुर्जर (वय 23) आणि सुरेश लोहार (वय 22) अशी या दोन आरोपींची नावं आहेत. यातील मुख्य आरोपी नारायण चंपालाल गुर्जर अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
मुंबई - वडाळाच्या म्हाडा कॉलनी परिसरातील काजल ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक करण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आलं आहे. नारायण गुर्जर (वय 23) आणि सुरेश लोहार (वय 22) अशी या दोन आरोपींची नावं आहेत. यातील मुख्य आरोपी नारायण चंपालाल गुर्जर अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
मूळचे गुजरातचे असलेले काजल ज्वेलर्सचे मालक महेंद्र मंदावर यांचं वडाळा येथील म्हाडा कॉलनी परिसरात सोने-चांदीचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी २.३० वा. नेहमीप्रमाणे महेंद्र हे जेवण्यासाठी दुकान बंद करून जेवायला गेले. याच संधीचा फायदा घेत आरोपी नारायण गुरूजरने बनावट चावीच्या मदतीने ज्वेलर्स उघडून तब्बल दोन कोटींचा ऐवज चोरला होता. या प्रकरणात आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना राजस्थानच्या बागौर येथून अटक केली आहे. यातील आरोपी नारायण गुर्जर हा तीन वर्ष व्यापाऱ्याकडे कामाला होता. त्यामुळे दुकानात मालकाची प्रत्येक गोष्टीची त्याला माहिती होती. चोरी करण्याच्या उद्देशानेच मालकाच्या नकळत त्याने दुकानाच्या बनावट चाव्या बनवल्या होत्या. कालांतराने नोकरी सोडल्यानंतर चोरी केली तर आपल्यावर कुणी संशय घेणार नाही. त्यामुळेच त्याने नोकरी सोडून दिल्यानंतर मित्र सुरेश लोहार आणि नारायण चंपालाल गुर्जर याच्या मदतीने गुरुवारी दुपारी चोरी केली. तेथून तिघंही राजस्थानला पळून गेले होते.