मुंब्य्रातील मंदिरात घातपात घडवण्याचा होता प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:09 AM2019-02-08T06:09:53+5:302019-02-08T06:10:28+5:30
मुंब्य्रातील मुंब्रेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादामध्ये विष मिसळवून घातपात घडवण्याचा कट इसिसच्या संपर्कात असलेल्या संशयित आरोपींचा होता. तशी कबुली आरोपींनी एटीएसकडे दिली असून, त्या पार्श्वभूमीवर मंदिराला सुरक्षा पुरवण्याची मागणी मंदिराच्या विश्वस्त समितीने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना केली आहे.
- कुमार बडदे
मुंब्रा - मुंब्य्रातील मुंब्रेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादामध्ये विष मिसळवून घातपात घडवण्याचा कट इसिसच्या संपर्कात असलेल्या संशयित आरोपींचा होता. तशी कबुली आरोपींनी एटीएसकडे दिली असून, त्या पार्श्वभूमीवर मंदिराला सुरक्षा पुरवण्याची मागणी मंदिराच्या विश्वस्त समितीने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना केली आहे.
इसिसच्या संपर्कात असलेल्या काही संशयित तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या महिन्यात मुंब्य्रातून ताब्यात घेतले होते. मुंब्य्रातील मुंब्रेश्वर महादेव मंदिर ४०० वर्षे जुने आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंदिरात पार पडलेल्या भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याशिवाय, महाशिवरात्रीच्या दिवशीही दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यावेळी पिण्याच्या पाण्यात विष मिसळून घातपात करण्याचा कट संशयित आरोपींनी रचला होता. त्यासाठी त्यांनी मंदिराची रेकीही केली होती.
आरोपीच्या जबाबानुसार औरंगाबाद येथील दहशतवादीविरोधी पथकाने मंदिराचा अलीकडेच पंचनामा केला. मंदिराची सात एकर जागा आहे. तिथे गोशाला आणि सत्संग भवन आहे. मंदिराची संरक्षक भिंत जीर्ण झाली असून, तेथून असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे मंदिराला संरक्षण पुरवण्याची मागणी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.