नागपुरात हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न : पोलीस दलात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:20 PM2020-02-27T23:20:10+5:302020-02-27T23:22:05+5:30
चालान कारवाईमुळे संतप्त झालेल्या एका वाहनचालकाने वाहतूक शाखेच्या हवालदाराला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालान कारवाईमुळे संतप्त झालेल्या एका वाहनचालकाने वाहतूक शाखेच्या हवालदाराला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखल्याने हवालदार बचावले. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास भांडेप्लॉट चौकाजवळ ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
सुभाष लांडे असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. २४ फेब्रुवारीला सुभाष लांडे यांनी आरोपी अरविंद रामाजी मेटे (वय ३६) याच्याविरुद्ध कारवाई केली होती. व्हॅन जप्त केल्याने मेटेने यावेळी लांडेंना पाहून घेण्याची धमकी दिली होती. गुरुवारी दुपारी मेटेने चालान पावती दाखवून न्यायालयात दंडाची रक्कम जमा केली. ती पावती दाखवून त्याने आपली व्हॅन पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेतली, मात्र त्याचा लांडेंवरचा राग शांत झाला नव्हता. तो त्यांच्या मागावर होता. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लांडे मोटरसायकलवर बसून मोबाईलवर भांडेप्लॉट चौकाजवळ बोलत होते. ते पाहून आरोपी मेटेने त्यांच्यावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारल्याने लांडे बचावले, मात्र त्यांच्या पायाला दुखापत झाली. दरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कळवून आरोपी मेटेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र मेटे घटनास्थळीच व्हॅन सोडून पसार झाला. या खळबळजनक घटनेची माहिती कळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. लांडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सक्करदरा पोलिसांनी आरोपी अरविंद मेटेविरुद्ध कर्तव्यावरील पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.