चोरटयांकडून कंपन्या लक्ष; सहा दिवसात ४ कंपन्यांमधील मालाची लूट
By प्रशांत माने | Published: September 13, 2023 06:03 PM2023-09-13T18:03:27+5:302023-09-13T18:04:17+5:30
मानपाडा हद्दीत घरफोडयांचे सत्र सुरूच आहे पण गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांमधील माल चोरून नेला जात आहे.
डोंबिवली: एकिकडे इमारती, चाळींमधील बंद घरांचे कुलुप तोडून चोरटयांनी मध्यरात्रीसह दिवसाढवळया घरातील मुद्देमाल आणि ऐवज लांबविले जात असताना चोरटयांनी आता एमआयडीसी तसेच ग्रामीण भागातील कंपन्यांना लक्ष करायला सुरूवात केली आहे. सहा दिवसात मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार कंपन्यांचे बंद शटर आणि लोखंडी गेट तोडून एकुण ३ लाख ५७ हजारांचा माल चोरटयांनी लांबविला आहे.
मानपाडा हद्दीत घरफोडयांचे सत्र सुरूच आहे पण गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांमधील माल चोरून नेला जात आहे. शुक्रवारी फेज १ मधील दिव्या एंटरप्रायझेस कंंपनीचे गेट तोडून चोरटयांनी येथून ७० हजाराचा माल चोरून नेला तर सोमवारी तब्बल तीन कंपन्यांमधील माल लंपास केल्याच्या वेगवेगळया घटना घडल्या आहेत. फेज २, गोळवली तसेच सागाव येथील कंपन्यांना लक्ष करीत चोरटयांनी येथून लाखोंचा मुद्देमाल लुटला आहे. एकाच दिवशी मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास घडलेल्या या तीन घटनांनी कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाटयावर आला आहे. एका कंपनीत तर सुरक्षारक्षक असताना दोघा चोरटयांनी कंपनीचे लोखंडी गेट आणि शटर तोडून आतील मुद्देमाल चोरला आहे. या एकंदरीत चारही घटनांप्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हयांची नोंद झाली असलीतरी चोरटयांनी घातलेला धुमाकुळ पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याची हद्द तब्बल ६८ कि.मी इतकी आहे. ग्रामीण आणि शहरी भाग असलेल्या या हद्दीत मोठया गृहसंकुलाची उभारणी झालेली आहे. वाढत असलेले नागरिकरण, रासायनिक आणि इतर कंपन्या, बार-रेस्टॉरन्टचे जाळे, कामानिमित्त परराज्यातून येणा-या नागरिकांचे अधिक वास्तव्य, लोकसंख्येच्या तुलनेत अपु-या पोलिस कर्मचारी वर्गामुळे कायदा सुव्यवस्था राखणे जिकरीचे बनले आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे हे जून महिन्यापासून सक्तीच्या रजेवर आहेत. या पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार पोलिस निरिक्षक सुरेश मदने हे सांभाळत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरिक्षक हे पद गेेले तीन महिने रिक्त आहे. दरम्यान या हद्दीचा अवाका आणि सुरू असलेले चोरीच्या घटनांचे सत्र पाहता गृहखात्याचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.