१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:09 IST2024-12-10T14:08:15+5:302024-12-10T14:09:11+5:30

बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक तासाचा व्हिडिओ बनवला आहे. 

Atul Subhash, a senior executive dies by suicide and has left a 24-page Suicide note in Bengaluru | १२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

बंगळुरू - सध्या महिलांसाठी बनलेल्या कायद्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पती-पत्नीच्या घटस्फोटाचे खटले कोर्टात दिर्घकाळ  प्रलंबित राहतात. तारखांवर तारखा मिळतात परंतु न्याय मिळत नाही. याच कायद्याच्या प्रक्रियेत अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीचा बळी गेला आहे. लग्नानंतर पत्नीसोबत आनंदी जीवन जगायचं स्वप्न पाहणाऱ्या अतुल यांना अग्निला साक्षी ठेवून घेणाऱ्या आगीतच आपल्याला जळून जावं लागेल याचा विचारही केला नसेल. पत्नीच्या एकापाठोपाठ एका गंभीर आरोपाने त्रस्त होऊन आणि कोर्टात न्याय मिळत नसल्याने निराशा आलेल्या अतुलने आयुष्याची लढाई अर्धवट सोडली आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. 

अतुल सुभाष यांच्या मानसिक छळाचा अंदाज यावरून लावता येईल की त्यांनी मृत्यूपूर्वी जवळपास २४ पानाची सुसाईड नोट लिहिली आहे. दीड तासाचा व्हिडिओ बनवला ज्यातून त्यांना होणारा त्रास दिसून येतो. बंगळुरूतील अतुल सुभाष यांचं लग्न उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारी निकिता सिंघानिया यांच्याशी झालं. लग्नाच्या काही दिवसापर्यंत सर्वकाही सुरळीत होते. त्यानंतर निकिता अचानक बंगळुरूवरून जौनपूरला निघून गेली. तिने पती अतुल आणि सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचार याचा खटला भरला.

सासरच्यांवर लावले आरोप

अतुल सुभाष याने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत म्हटलंय की, माझ्या मृत्यूसाठी पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया, चुलत सासरे सुशील सिंघानिया हे जबाबदार आहेत. पैसे हडपण्यासाठी निकिता आणि तिच्या घरच्यांनी षडयंत्र रचले. मला आणि माझ्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवले असा आरोप त्याने केला. आतापर्यंत कोर्टात १२० तारखा झाल्या, ४० वेळा मी स्वत: बंगळुरूहून जौनपूरला गेलो. आई वडील-भावालाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. बहुतांश तारखेला कोर्टात काहीच हाती लागलं नाही. कधी न्यायाधीश यायचे नाहीत तर कधी कामामुळे तारीख पुढे ढकलली जायची. अतुलला त्याच्या कामावर केवळ २३ सुट्टी मिळत होत्या. कायदेशीर जाचात अडकलेल्या अतुलची अवस्था बिकट झाली होती.

पत्नी निकिताने पती अतुल आणि त्याच्या कुटुंबाविरोधात ६ खटले कनिष्ठ कोर्टात आणि ३ खटले हायकोर्टात दाखल केले होते. निकिताने अतुल आणि त्याच्या घरच्यांवर हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक संभोग, घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ हे आरोप केले होते. या आरोपांमध्ये जामीन मिळणेही कठीण होते. २०१९ साली पत्नीने १० लाख हुंडा मागितल्याचा आरोप केला होता त्यात धक्क्यात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप केला. जेव्हा तपासणी सुरू झाली तेव्हा निकिताचे वडील हार्ट पेशंट होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. वडिलांच्या आजारपणामुळेच घरच्यांनी निकिताचे लग्न लवकर केले होते. निकीताने पतीला घटस्फोटासाठी दर महिना २ लाख रुपये मागितले होते. मुलांनाही अतुलपासून दूर ठेवले. 

जजनं उडवली खिल्ली, लाच मागितल्याचा आरोप

जौनपूरच्या फॅमिली कोर्टातील न्यायाधीशावरही आरोप लावण्यात आले आहे की, कोर्टात तारखांसाठी लाच द्यावी लागत होती. ३ कोटी नुकसान भरपाईसाठी न्यायाधीशांनी दबाव आणला. डिसेंबर २०२४ मध्ये खटला निकाली काढण्यासाठी ५ लाखांची मागणी केली. जेव्हा पत्नी मला आत्महत्येसाठी उकसावत असल्याचं मी सांगितले तेव्हा न्यायाधीश हसायला लागले. २०२२ मध्येही समोरच्या पक्षाने ३ लाखांची मागणी केली होती. लाच देण्यास नकार दिल्याने अतुलला पत्नीला नुकसान भरपाई देण्यासाठी महिन्याला ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

दरम्यान, अतुलने त्याच्या शेवटच्या व्हिडिओत न्याय प्रशासनाला आई वडिलांचा छळ करू नका असं आवाहन केले आहे. माझ्या भावाच्या परवानगीशिवाय पत्नी आणि तिच्या घरच्यांना आई वडिलांना भेटू देऊ नये. जोपर्यंत मला छळणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नका. जर न्याय मिळाला नाही तर मृत्यूनंतर अस्थी कोर्टासमोरील गटारात वाहून टाका असं अतुलने म्हटलं आहे.

Web Title: Atul Subhash, a senior executive dies by suicide and has left a 24-page Suicide note in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.