"आठवडाभर आंघोळ करायची नाही..."; अतुल-निकितामध्ये 'या' गोष्टीमुळे झालेलं पहिलं भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:12 IST2024-12-14T17:11:55+5:302024-12-14T17:12:19+5:30
अतुलने एक मोठा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

"आठवडाभर आंघोळ करायची नाही..."; अतुल-निकितामध्ये 'या' गोष्टीमुळे झालेलं पहिलं भांडण
बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर अतुल सुभाष आणि त्याची पत्नी निकिता यांच्यात पहिलं भांडण हे नॉनव्हेजवरून झालं होतं. जुलै २०२४ मध्ये कौटुंबिक न्यायालयात नोंदवलेल्या जबाबात अतुलने सांगितलं होतं की, तो आणि त्याचं कुटुंब शाकाहारी आहे. निकिता ही मांसाहारी आहे. ती आठवडाभर आंघोळ करायची नाही. या मुद्द्यावरून अतुल आणि निकिता यांची भांडणं व्हायची.
एकदा माझ्या आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निकिताने आईला ढकललं. तिच्यावर आणि माझ्यावर हल्ला करण्यात आला. लग्नापूर्वी निकिता दिल्लीत काम करायची. लग्नानंतर निकिताची बंगळुरूला बदली झाली. बंगळुरूला जाईपर्यंत दोघांमधील संबंध चांगले होते. पण, हळूहळू नॉनव्हेजवरून वाद वाढत गेला. निकिताची आई आणि भाऊ पैशांची मागणी करत होते.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आरोपी निकिताची आई निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया हे ढालगर येथील घर सोडून गेल्या ४८ तासांपासून फरार आहेत. या प्रकरणातील आरोपी निकिताचे काका सुशील सिंघानिया हेही घराबाहेर पडत नाहीत. बंगळुरू पोलीस गुरुवारी जौनपूरला पोहोचले आणि आरोपींना अटक केल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी अशी कोणतीही कारवाई केलेली नाही.
आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने एक मोठा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. पत्नी निकिता सिंघानिया, सासू, मेहुणा आणि त्याच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले. अतुलच्या वडिलांनी सांगितलं की, एप्रिल २०१९ मध्ये मुलाचं लग्न झालं होतं. यानंतर सून मुलासह बिहारला आली आणि २ दिवसांनी निघून गेली. यानंतर तिने मुलाला हनिमूनसाठी मॉरिशसला जायचं असल्याचं सांगितलं. त्यावर मुलाने बाबा, मी जाऊ का? असं विचारलं. तेव्हा मी म्हणालो की, सुनेची इच्छा असेल तर जा. त्यानंतर दोघेही मॉरिशसला गेले. २०२० मध्ये नातवाचा जन्म झाला.
"कोरोनात सासू घरी आली आणि माझा मुलगा उद्ध्वस्त झाला"; अतुलच्या वडिलांचा गंभीर आरोप
नातू लहान होता म्हणून मी माझ्या पत्नीला बंगळुरूला पाठवलं. २०२१ मध्ये जेव्हा देशभरात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होती, तेव्हाही मुलगा तिथे होता आणि त्याची आईही होती. मात्र, आईला मधुमेह असल्याने २०२१ मध्ये मुलाची काळजी घेण्यासाठी त्याने सासूला बोलावलं. निकिताची आई म्हणजेच अतुलची सासू बंगळुरूला येताच घरातील परिस्थिती आणखी बिघडू लागली आणि वाद सुरू झाला आणि मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.