तब्बल ३ कोटी ५१ लाखांची बोली; दाऊदच्या इमारतीचा लिलाव
By पूनम अपराज | Published: August 9, 2018 06:11 PM2018-08-09T18:11:03+5:302018-08-09T18:12:59+5:30
सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना बोली लावून लिलावात हि इमारत खरेदी केली आहे.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्यामुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवरील मासुल्ला इमारतीचा लिलाव आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. या लिलावात पाकमोडिया स्ट्रीटवरील मासुल्ला या इमारतीच्या सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना बोली लावून लिलावात हि इमारत खरेदी केली आहे. या लिलावात इमारत खरेदी केल्यानंतर या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे सैफी बुर्हानी ट्रस्टच्यावतीने जाहिर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या अगोदरच्या लिलावात मुंबईतील भेंडी बाजार येथील डामरवाला बिल्डिंगमधील काही गाळे आणि दिल्ली जायका हॉटेलच्या इमारतीचा लिलाव कारण्यात आला होता. या दोन्ही मालमत्ता सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने लिलावात जिंकल्या. यानंतर आता मसूल्ला ही इमारत लिलावात विकत घेऊन सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने दाऊद इब्राहिमच्या लिलावात काढलेल्या एकूण मालमत्त्यांपैकी 3 ठिकाणच्या मालमत्ता लिलावात जिंकल्या आहेत.
आज लिलाव झालेल्या इमारतीचे नाव अमिना मंजिल
आज ज्या इमारतीचा लिलाव झाला त्या इमारतीचे पूर्वीचे नाव मासूल्ला असे होते. मात्र. दाऊदने ती विकत घेतल्यानंतर त्याने त्याच्या आईचे नाव अमिना असल्याने ते नाव दिले. म्हणून त्यापासून ती इमारत अमिना मंजिल म्हणून ओळखली जाते.