काकी, भावाची हत्या करणाऱ्याला जन्मठेप; जुन्या वादाच्या रागातून केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:14 AM2023-03-26T07:14:32+5:302023-03-26T07:14:40+5:30
या घटनेत सखाराम याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
- हितेन नाईक
पालघर : मनोर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या निहे फरले पाडा येथील आरोपी शरद देऊ काटेला (३३) याने जुन्या भांडणाचा राग धरून शेजारी राहणारी सख्खी काकी लक्षी काटेला (५५) आणि भाऊ सखाराम काटेला (२७) यांना जीवघेणी मारहाण करीत त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी पालघर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. मकरंद देशपांडे यांनी आरोपीला जन्मठेप आणि ९ हजार रोख रक्कमेची शिक्षा ठोठावली.
आरोपी शरद काटेला आणि त्याचा सख्खा चुलत भाऊ सखाराम काटेला या दोघांमध्ये मोठा वाद होता. या वादातून आरोपी शरद याने सखाराम व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनोर पोलिसांनी अटक केली होती. हा राग धरून ४ ऑगस्ट २०१७ रोजी सखाराम मोटारसायकल वरून कामावर जात असताना आरोपीने सखारामशी हुज्जत घातली व सखारामच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्याला वाचविण्यासाठी पुढे आलेली त्याची आई लक्ष्मी व पत्नी सुचिता यांच्या डोक्यातही दांडक्याने मारून शरद पळून गेला.
या घटनेत सखाराम याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान लक्ष्मी हिचाही मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत पोलिस निरीक्षक महेश पाटील आणि टीमने आरोपीला अटक केली.