भयंकर! रात्री बॉयफ्रेंडला घरी बोलावलं पण नेमकं मावशीला समजलं; बदनामीच्या भीतीने तरुणीने...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:26 PM2022-12-07T17:26:35+5:302022-12-07T17:33:56+5:30
विद्यार्थिनीने रात्री तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते आणि हे पाहून भाड्याने राहणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली.
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनीने रात्री तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते आणि हे पाहून भाड्याने राहणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर बदनामी आणि भीतीपोटी या विद्यार्थिनीने खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औरैया जिल्ह्यातील दिबियापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. जिथे भाड्याच्या घरात राहणारी विद्यार्थिनी पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होती. तर मृत विद्यार्थिनी ही तिच्या मावशीच्या घरी राहून बीएचे शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री मावशी आपल्या एका नातेवाईकाच्या प्रसूतीसाठी इटावा येथे गेल्या होत्या. तर तिचा नवरा हा दिल्लीत कामाला असल्याने घरात कोणीच नव्हते. त्यामुळे मावशीच्या घरी राहणाऱ्या या तरुणीने संधीचा फायदा घेत आपल्या प्रियकराला रात्री घरी बोलावले होते.
घरात भाड्याने राहणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनीने हा प्रकार पाहून खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि मुलीच्या मावशीला फोन करुन ही माहिती दिली. याची माहिती कळताच खोलीत उपस्थित दोघेही घाबरले. त्यानंतर मुलाने दरवाजा तोडून तेथून पळ ठोकला. बदनामी आणि घरच्यांना घाबरुन तिने खोलीत जाऊन गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.
डेप्युटी एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. काल रात्री मुलीच्या घरी कोणी नव्हते, त्यानंतर तिने प्रियकराला घरी बोलावले. याबाबत घरात राहणाऱ्या विद्यार्थिनीने घरच्यांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने हे पाऊल उचलले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार आलेली नाही. पोलीस या घटनेच्या तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.