औरंगाबादेत भरदिवसा तीन एटीएम फोडणाऱ्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 06:06 PM2018-07-21T18:06:11+5:302018-07-21T18:07:23+5:30
भरदिवसा विविध ठिकाणचे तीन एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : भरदिवसा विविध ठिकाणचे तीन एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले. पुढील कारवाईसाठी त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रदीप ऊर्फ लखन रणजित वानखेडे (३०, रा. छोटा मुरलीधरनगर), असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, १३ जुलै रोजी सकाळी ७ ते ८.१५ वाजेदरम्यान उस्मानपुरा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि येस बँकेचे, तर गजानन महाराज मंदिर ते गारखेडा रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचे एक, असे तीन एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी उस्मानपुरा आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
भरदिवसा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, हकीम पटेल, संतोष सूर्यवंशी, संजय खोसरे, नितीन मोरे आणि सानप हे घटना घडल्यापासून तपास करीत होते. दोन्ही एटीएम सेंटरवरील सीसीटीव्ही फुटेज आणि सेफ सिटी कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली असता एटीएम फोडणारा एकच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सकाळी तो पोलिसांना रेल्वेस्टेशन परिसरात दिसला. मात्र, खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात न घेता त्याच्यावर दुरून नजर ठेवण्याचे ठरविले.
मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत केला पाठलाग
आरोपी मनोरुग्णासारख्या हालचाली करीत असल्याचे दिसले. त्याला दारू, गांजाचे व्यसन आहे. सकाळी तो रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे पायी निघाला. पोलीस त्याच्या मागावर होते. बसस्थानक परिसरातील दारू दुकानात तो गेला आणि दुकानदाराकडे त्याने दारू मागितली. त्याच्याकडे पैसे नसल्याने दुकानदाराने त्याला टोमॅॅटो दिले. तो टोमॅटो खात बाहेर आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणले. त्याने एटीएम फोडल्याची कबुली दिली.