ऑस्ट्रेलियाच्या शिक्षिकेची बॅग लंपास ! मित्रासोबत भारत दौरा करताना घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:57 AM2023-05-23T11:57:13+5:302023-05-23T11:57:22+5:30
तक्रारदार या ऑस्ट्रेलियामधील विक्टोरिया परिसरात राहणाऱ्या असून सध्या खार पश्चिमेला राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑस्ट्रेलियावरून भारत दौऱ्यावर आलेल्या एका २६ वर्षीय शिक्षिकेची बॅग रिक्षातून हिसकाविण्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला. याप्रकरणी त्यांनी अनोळखी चोराच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्याचा शोध सध्या सुरू आहे.
तक्रारदार या ऑस्ट्रेलियामधील विक्टोरिया परिसरात राहणाऱ्या असून सध्या खार पश्चिमेला राहतात. त्या प्राथमिक शाळेत शिक्षिका असून, त्यांचा मित्र हा हॉटेल मॅनेजर म्हणून काम करतो. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्या त्यांच्या मित्रासोबत हॉटेल रूम खाली आल्या आणि एक रिक्षा पकडली. वांद्रे परिसरात कोणत्याही कॅफेमध्ये घेऊन जा असे त्यांनी चालकाला सांगितले, मात्र दहा मिनिटांनी वाहतूक कोंडीमुळे पाली हिल परिसरात त्यांची रिक्षा थांबली. त्यावेळी त्यांच्या रिक्षाच्या बाजूने पायी चालत जाणारे अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराच्या खांद्यावर असलेली निळी बॅग हिसकावून पळ काढला. तेव्हा या दोन्ही परदेशी नागरिकांनी उतरून त्याचा पाठलाग केला, मात्र तो कुठे गेला याबाबत काहीच समजले नाही. त्यानंतर त्यांचा रिक्षावालाही तिथून गेला. त्यामुळे शिक्षिकेने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार बॅग हिसकावणारा तरुण हा २५ ते ३० वयोगटातील असून तो पुन्हा समोर आल्यास त्याला मी ओळखीन असे तक्रारदाराने सांगितले. चोरी केलेल्या बॅगेत १ लाख २० हजारांची रक्कम, ६० हजार रुपयांचा फोन, ३० हजार रुपये किमतीचे ॲपल पॅड तसेच अन्य सामान होते जे चोरीला गेले.