मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 05:24 PM2020-08-09T17:24:44+5:302020-08-09T17:29:45+5:30
पोलिसांच्या माहितीनुसार कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय गफ्फार अहमद कच्छावा रिक्षा चालवण्याचं काम करतात.
सीकर – राजस्थानच्या सीकर येथील एका वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काही टवाळखोरांनी या रिक्षा चालकाला मारहाण करत मोदी झिंदाबाद, जय श्री राम अशा घोषणा देण्यास सांगितल्या. या प्रकरणात पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय गफ्फार अहमद कच्छावा रिक्षा चालवण्याचं काम करतात. शुक्रवारी सकाळी झीगर गावातील प्रवासी सोडून ते परतत होते, तेव्हा जगमालपुरा आणि छोटी झीगर दरम्यान एका गाडीतून उतरुन २ जणांना त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गफ्फार यांचा डोळा सुजला आहे. तर दात तुटले आहेत. चेहऱ्यावर मारहाण केल्याचे निशाण दिसत आहेत. तसेच हल्लोखोरांनी त्यांचे घड्याळ आणि ७०० रुपयेही चोरल्याचा आरोप तक्रारीत आहे.
याबाबत गफ्फार अहमद कच्छावा यांनी सांगितले की, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता मी माझ्या नातेवाईकांना शेजारच्या गावात सोडण्यासाठी गेलो होतो, तिथून परतताना एका कारमधील दोघांनी मला थांबवलं आणि तंबाखू मागितली. मी त्यांना तंबाखू दिल्यानंतर त्यांनी नकार दिला आणि मला मोदी झिंदाबाद घोषणा द्यायला सांगितली. मी घोषणा देण्यास नकार दिल्याने त्यांनी मला मारहाण केली. त्यानंतर मी रिक्षा घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माझा पाठलाग केला. जगमालपुरा येथे माझी रिक्षा अडवली. मला रिक्षातून बाहेर पडण्यास सांगत मला शिवीगाळ केली. तसेच जय श्री राम आणि मोदी झिंदाबाद घोषणा देण्यासाठी माझ्यावर बळजबरी केली असा आरोप त्यांनी केला आहे.
सीकर पोलिसांनी अहमद कच्छवा यांच्या तक्रारीनंतर दोघांना अटक केली आहे, त्यांचे नाव शंभुदलाल जाट आणि राजेंद्र जाट असे आहे. या दोघांनी त्यांची गाडी पार्क केली होती, आणि दारु पित होते, त्यानंतर गफ्फार अहमद यांची रिक्षा त्यांनी अडवली आणि त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर दोघांनी बेदम मारहाण केली. या दोघांवर धार्मिक भावना भडकावणे, चोरी, मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सध्या गफ्फार यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
तब्बल १४ वर्षापूर्वी रेल्वेत चोरी झालेलं पाकीट सापडलं; ९०० रुपयांसह मालकाला परत दिलं, पण...
रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु
कुटुंबाने ज्या व्यक्तीला मृत समजून दफन केले ‘तो’ पुन्हा जिवंत परतला; पोलिसांनाही बसला धक्का
कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा
बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा