नाशिकमध्ये रिक्षाचालकाचा रॉडने हल्ला करून खून; अर्ध्या तासांत ३ हल्लेखोर ताब्यात
By अझहर शेख | Published: February 11, 2024 05:02 AM2024-02-11T05:02:08+5:302024-02-11T05:02:44+5:30
घटनेची माहिती मिळताच चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे आधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली
नाशिक : किरकोळ कारणातून झालेल्या वादाचा बदला म्हणून तिघांनी एका रिक्षाचालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केल्याची घटना अंबड पोलीस ठाणे हद्दीत चुंचाळे भागात शनिवारी (दि.१०)रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. शंकर गाडगीळ (३५,रा.घरकुल वसाहत) असे मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
किरकोळ वादातून शनिवारी दुपारी शाब्दिक चकमक चौघांमध्ये झाली होती. शंकर गाडगीळ व आरोपी हल्लेखोर सोनू नवगिरे, सोनू कांबळे, महेंद्र कांबळे यांचा काही तरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद त्यावेळी मिटला मात्र तिघांनी डोक्यात राग धरून रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास शंकर यास एकटे गाठले. त्यांच्यामध्ये पुन्हा दुपारच्या घटनेवरून बाचाबाची होऊन शिवीगाळ करत मारहाण सुरू झाली. यावेळी तिघांपैकी कोणीतरी एकाने रोड डोक्यात टाकल्याने शंकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे आधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शोध पथकाने हल्लेखोरांची ओळख पटवून तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या अर्ध्या तासात तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू होते.