भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाने केली प्रवाशाची हत्या; दुसरा प्रवासी आयसीयूमध्ये, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 05:05 PM2023-06-14T17:05:09+5:302023-06-14T17:05:25+5:30
एवढेच नाही तर या घटनेत प्रवाशाचा भाऊही गंभीर जखमी झाला आहे. त्याची गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
छोट्या- छोट्या मुद्द्यांवरून लोक इतके चिडतात की एकमेकांना मारायलाही मागेपुढे पाहत नाहीत. दरम्यान, बंगळुरूमध्ये एका रिक्षाचालकाने भाड्याच्या वादातून प्रवाशाची हत्या केल्याचे समोर आले आहे. रिक्षाचालकाने धारदार शस्त्राने वार करून प्रवाशाचा खून केला. एवढेच नाही तर या घटनेत प्रवाशाचा भाऊही गंभीर जखमी झाला आहे. त्याची गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. दोन प्रवासी एका रिक्षातून मॅजेस्टिकवरून यशवंतपूर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघाले होते. ते रेल्वेस्थानकावर पोहोचले, तेव्हा रिक्षाचालकाने ठरल्यापेक्षा जास्त पैसे देण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर पुढे बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत झाले. यामुळे रागाच्या भरात रिक्षाचालकाने दोन्ही प्रवाशांवर धारदार शस्त्राने वार केले.
या घटनेत दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळावरून नेण्यात आले. मात्र, त्यातील एका प्रवाशाचा वाटेतच मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव अहमद असून गंभीर जखमी झालेल्या त्याच्या भावाचे नाव आयुब आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी माहिती पोलिसांना कळताच तातडीने तपास सुरू करण्यात आला. जखमी आयुबकडून मिळालेली माहिती आणि त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपी रिक्षाचालकाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीची चौकशी केली जात आहे. तसेच, आरोपी रिक्षाचालकावर हा पहिलाच गुन्हा नाही. तर यापूर्वीही अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे, असे पोलिसांनी सांगितले.