“या घरात आधीच चोरी झालीय, फुकट मेहनत करू नका”; घराबाहेर लोकांनी लावले पोस्टर्स, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:24 AM2021-06-14T10:24:10+5:302021-06-14T10:26:57+5:30
चोरीमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून त्यांनी घराच्या बाहेर पोस्टर्स चिटकवले आहेत.
रांची – झारखंडची राजधानी रांचीच्या पुनदाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मागील १० दिवसात या परिसरात १२ पेक्षा अधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. इतकं होऊनही अद्याप या चोरांचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. लवकरात लवकर पोलिसांनी चोरांना पकडावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
नागरिकांच्या मनात चोरीची इतकी भीती आहे की, ‘आमच्या घरात आधीच चोरी झाली आहे, त्यामुळे उगाच कष्ट घेऊ नका’ असा संदेश घराच्या दरवाजांवर लिहिला आहे. घरातील किंमती वस्तू चोरी झाल्यानंतर लोकांनी भीतीपोटी आता घराच्या दरवाजावर असे संदेश लिहिले आहेत. लोक सांगतात की, पुनदाग ओपी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना होत आहेत. चोरीच्या घटनांमुळे अनेकांनी त्यांच्या घरातील किंमती वस्तू, पैसे गमावले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार करूनही अद्याप या घटनांना आळा बसलेला नाही.
चोरीमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून त्यांनी घराच्या बाहेर पोस्टर्स चिटकवले आहेत. ज्यात लिहिलंय की, याठिकाणी आधीच चोरी झाली आहे. उगाच कष्ट करू नका. चोरीच्या या घटनांमुळे घरमालकच नव्हे तर भाडेकरूही त्रस्त झालेत. लोक घराला कुलूप लावून बाहेर जाण्यासही घाबरत आहेत. रांचीच्या पुगदाग परिसरातील भगवती नगरमध्ये एकाच रात्री अनेक घरांमध्ये चोरीची घटना घडली. ज्यात लाखो रुपयांसह सोने, चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे.
घराला टाळा लागला की चोरीच झाली समजा
पुनदागच्या परिसरात शनिवारी एकाच रात्री अनेक घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. शिक्षण विभागात काम करणाऱ्या जितेंद्र सिंह यांच्या घरी चोरांनी कुलूप तोडून रोकड आणि ज्वेलरी चोरी झाली. त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या मनोज अग्रवाल यांच्या घरातही चोरांनी हात साफ केला. त्याचसोबत शेजारील संजीव कुमार खन्ना यांच्या घरी रोकड, ज्वेलरी चोरण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या परिसरात राहणाऱ्या राहुल यांनी सांगितले की, चोरीच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन मात्र आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे घराच्या सुरक्षेसाठी आता लोक चोरांना आवाहन करताना पोस्टर्स पाहायला मिळत आहे.