अवधा खून प्रकरण : आरोपी विठ्ठल किसन इंगळे याला जन्मठेप
By सदानंद सिरसाट | Published: May 3, 2024 04:17 PM2024-05-03T16:17:56+5:302024-05-03T16:22:44+5:30
घटनेच्या दिवशी म्हणजे ८ जून २०१० रोजी रवींद्र महादेव इंगळे यांच्यावर आरोपी विठ्ठल किसन इंगळे याने भाल्याने प्राणघातक हल्ला केला होता.
मलकापूर (बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील अवधा येथील रवींद्र महादेव इंगळे यांच्या खून प्रकरणात आरोपी विठ्ठल किसन इंगळे याला जन्मठेप, सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम मृत रवींद्र इंगळे यांच्या पत्नीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश २ मे रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. कदम यांनी दिला.
घटनेच्या दिवशी म्हणजे ८ जून २०१० रोजी रवींद्र महादेव इंगळे यांच्यावर आरोपी विठ्ठल किसन इंगळे याने भाल्याने प्राणघातक हल्ला केला होता. यावरून नांदुरा पोलिस ठाण्यात मृत रवींद्र इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणेदार अ. बा. पाटील यांनी केला. दोषारोपपत्र सत्र न्यायालय, मलकापूर येथे दाखल केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी कडू बोरसे यांनी काम केले. न्यायालयाने एकूण १३ साक्षीदार तपासले.
मृताची पत्नी व अन्य साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या पुराव्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. तसेच सरकार पक्षातर्फे ॲड. विवेक बापट यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विठ्ठल इंगळे याला भादंविचे कलम ३०२ नुसार सक्तमजुरीसह जन्मठेप व ३० हजार रुपये दंडाची रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.