'बाप माणूस' या चित्रपट निर्मात्याची गणपती मंदिरात गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:49 PM2019-01-16T19:49:34+5:302019-01-16T21:06:46+5:30
सदानंद उर्फ पप्पु लाड यानी गळफास घेत केली आत्महत्या
मुंबई - 'बाप माणूस' या चित्रपटाची निर्मिती करणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद ऊर्फ पप्पू लाड (५५) यांनी बुधवारी सकाळी गिरगाव येथील लाडाचा गणपती मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून घटनास्थळाहून पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंदिरात आत्या भागात असलेल्या एका खोलीत त्यानी गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच डी. बी. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसले तरी आर्थिक बाबीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सदानंद लाड यांनीच चर्नी रोड येथील लाडाचा गणपती हे मंदिर बांधले होते. या मंदिराच्या बांधकामानंतर लाड प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर लाड यांनी बाप माणूस या मराठी चित्रपटासह १५ हून अधिक मराठी तसेच भोजपुरी चित्रपटांची निमिर्ती केली आहे. त्यापैकी देहांत, कुंभारवाडा, डोंगरी, श्श्श... तो आलाय, लाडाची चिंगी, धुर्पी, स्वामी, झिंगाट, मोहब्बत की जंग, दगाबाज पंडित, जब जब खून पुकारे असे काही चित्रपट आहेत. लाडांच्या या चित्रपटांची चर्चा अधिक झाली असली तरी त्यांनी निर्मिती केलेले बहुतांश चित्रपट अपयशी झाले होते. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.