‘बाबा का ढाबा’ पुन्हा एकदा चर्चेत; जीवे मारण्याच्या धमकीवरून कांता प्रसाद यांना रडू कोसळलं
By प्रविण मरगळे | Published: December 18, 2020 08:34 AM2020-12-18T08:34:28+5:302020-12-18T08:35:53+5:30
‘बाबा का ढाबा’ अवघ्या काही महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आले, रातोरात युट्यूबच्या माध्यमातून बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद सुप्रिसद्ध झाले,
नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत असणारे ‘बाबा का ढाबा’वाले कांता प्रसाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. यावेळी बाबा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी विनवणी करत आहेत. सध्या ते इतक्या दहशतीखाली आहेत की त्यांना घराच्या बाहेर पडतानाही भीती वाटत आहे. वारंवार मला जीवे मारण्याची धमकी येत आहे असा बाबांनी आरोप केला आहे तसेच त्यांचा ढाबा जाळण्याचीही धमकी मिळाली आहे.
‘बाबा का ढाबा’ अवघ्या काही महिन्यात प्रसिद्धीच्या झोतात आले, रातोरात युट्यूबच्या माध्यमातून बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद सुप्रिसद्ध झाले, अचानक मिळालेल्या या प्रसिद्धी आणि पैशामुळे अनेक जण माझ्यावर जळू लागले असं ते सांगतात, मात्र कधीही यापूर्वी माझं कोणाशी भांडण अथवा तंटा झाला नाही, तरीही गेल्या काही दिवसांपासून बाबाला फोनवरून आणि ढाब्याजवळ येऊन काही जण धमक्या देत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
बाबाचा ढाबा जाळण्याची धमकी मिळत असून या प्रकाराबाबत बाबाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ज्यावर पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवला नसून तक्रारीच्या आधारावरून तपास सुरु केला आहे. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांनंतर बाबाचे वकील प्रेम जोशी पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. वकील प्रेम जोशींनी याबाबत मालवीय नगरमध्ये तक्रार नोंदवली आहे.
बाबाच्या वकिलांचं म्हणणं आहे की, धमक्या मिळण्याच्या प्रकारामागे युट्यूबर गौरव वासन याचा हात असल्याचा संशय वाटतो. मात्र याचा कोणताही पुरावा बाबाकडे नाही. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर बाबाने ११ डिसेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार केली, ज्याच्यावर तपास सुरु आहे, परंतु एफआयआर नोंदवला नाही.
माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे – गौरव वासन
‘बाबा का ढाबा’ला रातोरात प्रसिद्ध करणाऱ्या गौरव वासन याने सांगितले की, माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, कोणीतरी बाबाला चुकीचं सांगून दिशाभूल करत आहे. माझ्यावर जाणुनबुजून खुन्नस काढली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करून सत्य लवकरच समोर आणतील असा विश्वास गौरवने व्यक्त केला.