Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:53 PM2024-10-18T12:53:58+5:302024-10-18T12:54:35+5:30
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्या तीन सिक्योरिटी गार्ड्सचे जबाब नोंदवले आहेत.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्या तीन सिक्योरिटी गार्ड्सचे जबाब नोंदवले आहेत. बाबा सिद्दिकी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेला २+१ म्हणतात, म्हणजेच दिवसा दोन आणि रात्री एक सिक्योरिटी गार्ड त्यांच्यासोबत असायचा.
बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्वेला गेले तेव्हा त्यांच्यासोबत दोन सिक्योरिटी गार्ड होते. सिद्दिकी तेथून निघण्यापूर्वी म्हणजे साडेआठच्या सुमारास एक सिक्योरिटी गार्ड तेथून निघून गेला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्यासोबत एकच सिक्योरिटी गार्ड होता. त्यावेळी त्या सिक्योरिटी गार्डने प्रत्युत्तर दिलं नाही. कारण त्याच्या डोळ्यात मिरचीसारखं काहीतरी अचानक गेलं आणि त्यामुळे तो तेव्हा काहीच करू शकला नाही, असा सिक्योरिटी गार्डने दावा केला आहे.
बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी गुरुवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन वडिलांच्या हत्येच्या सुरू असलेल्या तपासाबाबत चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. या घटनेशी संबंधित काही माहितीही त्यांनी शेअर केली. दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची झिशान यांच्या ऑफिसबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
"गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द
शूटर्सनी सिद्दिकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना म्हटलं होतं की, "मला गोळ्या लागल्या आहेत आणि मला वाटत नाही की, मी वाचू शकेन" हेच त्यांचे शेवटचे शब्द असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. गोळीबारानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.