Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 09:45 AM2024-10-16T09:45:13+5:302024-10-16T09:55:00+5:30
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांबाबत मुंबई पोलिसांनी नवा धक्कादायक खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात तीन महिन्यांपूर्वीच रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांबाबत मुंबईपोलिसांनी नवा धक्कादायक खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात तीन महिन्यांपूर्वीच रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मारेकऱ्यांनी YouTube वर व्हिडीओ पाहिले. ते पाहून पिस्तूल चालवायला शिकले. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर एकमेकांशी संवाद साधायचे. सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.
शनिवारी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांना मारण्यासाठी आलेले शूटर गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांनी सहा राऊंड फायर केले होते. रुग्णालयात नेत असताना सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पिस्तूल चालवायला ते कोणाकडून शिकले याचा पोलीस तपास करत असताना भयंकर माहिती समोर आली आहे. ते यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शूटिंगचा सराव करत होते.
प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक
मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणी आतापर्यंत १५ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत. सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरीश कुमार निषाद या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. हरीशने आरोपींना पैसे आणि शस्त्र पुरवल्याचा पोलिसांचा दावा आहे. यापूर्वी पोलिसांच्या पथकाने प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक केली होती. प्रवीण हा शुभमचा भाऊ आहे.
२ लाख रुपये दिले
पोलिसांनी सांगितलं की, प्रवीण आणि शुभम लोणकर यांनी शूटर गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना २ लाख रुपये दिले होते आणि हे पैसे चौथा आरोपी हरीश याच्यामार्फत पाठवण्यात आले होते. या हत्या प्रकरणातील तिसरा संशयित शूटर शिवा कुमार हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हरीश आणि धर्मराज हे त्याच गावचे आहेत जिथे फरार असलेला आणखी एक आरोपी गौतम राहतो.
तीन महिन्यांपूर्वी रचला कट
मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट सुमारे तीन महिन्यांपूर्वी रचला गेला होता आणि आरोपी अनेक वेळा शस्त्राशिवाय त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते. हत्येचा कट पुण्यात रचला होता. गोळीबार करणाऱ्यांना बाबा सिद्दिकी यांचा फोटोही देण्यात आला असून हे टार्गेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. घटनेच्या २५ दिवस आधी घर आणि ऑफिसची रेकीही केली होती. आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅपचॅट आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे.