Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:30 PM2024-10-23T13:30:54+5:302024-10-23T13:32:02+5:30
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलीस सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याआधी शूटर्सनी कर्जत खोपोली रोडवरील जंगलात पिस्तुलाने गोळीबार करण्याचा सराव केला होता.
आरोपी गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि फरार आरोपी शिवकुमार गौतम यांनी सप्टेंबर महिन्यात जंगलात जाऊन गोळीबार करण्याचा सराव केला आणि त्यानंतर दसऱ्याच्या रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला केला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी झाडावर गोळी चालवण्याचा सराव केला होता. कर्जत खोपोली रोडवर असलेल्या धबधब्याजवळील पळसदरी गावातील जंगलात हा सराव करण्यात आला.
आरोपींनी सराव करायला जाण्यासाठी कुर्ला स्टेशन ते लौजी रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेनने प्रवास केला हे चौकशीदरम्यान समोर आले आहे. तिथून रिक्षा पकडून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसदरी गावात पोहोचले. आरोपींनी स्टेशनवरून रिक्षा केली आणि आम्ही इथे फिरायला आलो आहोत असं सांगितलं. त्यामुळे कोणत्यातरी ठिकाणी आम्हाला घेऊन चल असं रिक्षा चालकाला सांगितलं. रिक्षा चालक आधी ज्या ठिकाणी घेऊन गेला तिथे लोकांची खूप गर्दी होती.
आरोपींनी यानंतर रिक्षा चालकाला डोंगर आणि घनदाट जंगल असलेल्या ठिकाणी नेण्यास सांगितलं, असा दावाही सूत्रांनी केला आहे. यानंतर चालकाने त्यांना पळसदरी गावाजवळील धबधब्याजवळ नेलं. धबधब्याच्या आवाजामुळे गोळीबाराचा आवाज कमी प्रमाणात येण्यास मदत होईल, असा अंदाज आरोपींचा होता. यानंतर आरोपींनी त्या जंगलात जाऊन झाडावर ५-१० राउंड फायरिंग करून गोळीबाराचा सराव केला.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
गोळीबार करणारे हे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचाच हात असल्याची खात्री आता अधिकाऱ्यांना झाली आहे. मात्र, हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अभिनेता सलमान खानशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. अनमोल बिश्नोई हा शूटर आणि कट रचणारा प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात असल्याचं डिजिटल पुराव्यांवरून समोर आलं आहे.