Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:05 IST2024-12-10T12:04:36+5:302024-12-10T12:05:22+5:30
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्लॅनचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे याची जबाबदारी स्वीकारली.

Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्लॅनचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे याची जबाबदारी स्वीकारली. ही हत्या करण्यापूर्वी अनमोल बिश्नोई आणि इतर काही गुंडांनी शुभमशी बोलून घटनेनंतर जबाबदारी घेण्याचे आदेश दिले होते.
सिद्दिकी यांच्या हत्येनंतर प्लॅननुसार सर्वप्रथम शुभमच्या नावाने फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आलं, त्यानंतर त्यावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली. यानंतर, प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढून ते प्रोफाईल डिलीट करण्यात आलं. सूत्रांनी सांगितलं की प्लॅनचा एक भाग म्हणून, स्क्रीनशॉट दिल्लीतून पब्लिक डोमेनमध्ये व्हायरल केला गेला. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, फेसबुक प्रोफाईल डिलीट केल्यामुळे त्याची URL कळू शकली नाही.
फेसबुकशी संपर्क साधूनही त्यामुळे जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट कुठून आली याचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी अनमोलने शुभमशी संपर्क साधल्याचे पुरावे मिळाले आहेत. अनमोल बिश्नोईने शुभम लोणकर आणि मुख्य शूटर शिवकुमार गौतमच नाही तर या प्रकरणातील अन्य अनेक आरोपी रुपेश मोहोळ (प्लॅन बीचा शूटर), नितीन सप्रे (शस्त्रे पुरविणाऱ्या गँगचा प्रमुख) यांचीही भेट घेतल्याचं तपासात समोर आलं आहे गौरव अपुने (प्लॅन बी चा दुसरा शूटर) आणि सुजित सिंब यांच्याशी अनेकदा बोललोा
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे संभाषण बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी झाले होते. या संवादादरम्यान अनमोल बिश्नोईने प्रत्येक वेळी त्यांना प्रवृत्त करण्याचे, मोठी रक्कम मिळवून देण्याचे आणि त्यांना सुरक्षितपणे परदेशात स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींच्या फोनमधून अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले असून त्यात अनमोलशी बोलल्याचा पुरावा आहे. एवढेच नाही तर या आरोपींनी चौकशीत याची कबुलीही दिली आहे.