Baba Siddique : १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:16 PM2024-11-21T12:16:18+5:302024-11-21T12:17:07+5:30

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे.

Baba Siddique murder case shooter shivakumar exposed his plans thrown his phone in nalasopara | Baba Siddique : १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं?

Baba Siddique : १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं?

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. शूटर शिवकुमार गौतमची गुन्हे शाखा सातत्याने चौकशी करत आहे. या चौकशीत बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांचे पुढचं प्लॅनिंग काय होतं, हे समोर आलं आहे. शिवकुमारने हत्येनंतर कोणाला फोन केला आणि त्या फोनचं काय केलं हे सांगितलं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शूटर्सना कुठे पाठवण्याची तयारी केली होती हेही त्याने सांगितलं.

गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत शिवकुमार गौतमने हत्येनंतर शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि अनुराग कश्यप (शूटर) यांना फोन केल्याचं सांगितलं. शिवकुमार त्यांच्याशी किमान १५ मिनिटं बोलला. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला हत्येच्या काही तासांनंतर शिवकुमारने शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्या सांगण्यावरून आपला फोन ठाणे स्टेशनजवळील नाल्यामध्ये फेकून दिला होता.

नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन 

शिवकुमारच्या फोनचा शोध घेतला जात आहे. त्याचवेळी शिवकुमारने असंही चौकशीदरम्यान सांगितलं की, शुभम लोणकर याने शिवकुमारला ठाण्याहून पुण्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चढण्यास सांगितले होते. हत्येनंतर शुभम लोणकरला केलेल्या कॉल दरम्यान शुभमने अनुराग कश्यपला (शिवासोबत अटक केलेला आरोपी) 'शूटर'साठी लपण्याची जागा शोधून नेपाळला पळून जाण्यास मदत करण्याची सूचना केली होती.

२० जिवंत काडतुसं

याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने रफिक शेख याला पुण्यातून अटक केली होती. त्याच्या घरातून २० जिवंत काडतुसं सापडली. या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत ८५ हून अधिक जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. ५ पिस्तुलही गुन्हे शाखेच्या हाती लागली आहेत. त्याचवेळी शूटर शिवकुमार गौतमने या प्रकरणात वापरलेलं हत्यार अजूनही गुन्हे शाखेच्या हाती लागलेलं नाही.
 

Web Title: Baba Siddique murder case shooter shivakumar exposed his plans thrown his phone in nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.