Baba Siddique : "बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शर्ट बदललं आणि गर्दीत..."; आरोपी शिवाचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 11:32 AM2024-11-12T11:32:21+5:302024-11-12T11:32:24+5:30
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याने उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचला अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती दिली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याने उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचला अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की तो आणि त्याचे साथीदार तीन दिवस बाबा सिद्दिकी यांची आणि आजुबाजूच्या परिसराची रेकी करत होते आणि दसऱ्याच्या दिवशी संधी मिळताच त्यांनी हत्या करण्याचा कट रचला.
शिवाने सांगितलं की, त्याला हत्येसाठी १० लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होते. हे आश्वासन त्याला लॉरेन्स बिश्नोई यांचा भाऊ अनमोल बिश्नोईने शुभम लोणकर याच्यामार्फत दिलं होतं. अनमोलने त्याला हत्येनंतर लाखो रुपयांसोबतच दर महिन्याला काही रक्कम देत राहीन असंही सांगितलं होतं. या संदर्भात शिवाने यासीन आणि शुभमने त्याला शस्त्र, मोबाईल आणि सिमकार्ड दिल्याचंही सांगितलं.
आपला फोन फेकला आणि नवीन विकत घेतला
बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर शिवकुमार गौतम हा शर्ट बदलून गर्दीत गायब झाला. त्याने घटनास्थळावरून कुर्ल्यापर्यंत ऑटो पकडली आणि तेथून ठाणे, नंतर पुण्यासाठी ट्रेन पकडली. जवळपास सात दिवस पुण्यात राहिल्यानंतर शिवाने झाशी आणि लखनौचा प्रवास केला. प्रवासादरम्यान त्याने आपला फोन फेकून दिला आणि नवीन फोन विकत घेतला.
हत्येनंतर नेपाळला पळून जाण्याचा होता प्लॅन
शिवाने असंही सांगितलं की, हत्येनंतर त्याचा प्लॅन उज्जैन आणि नंतर जम्मूतील वैष्णोदेवीला जाण्याचा होता. यानंतर तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी काही लोक त्याला मदत करत होते. शिवाला नेपाळला पाठवण्यात मदत करणाऱ्या आरोपींमध्ये अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली आहे.