बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; घरातच सुरू होता गोळीबाराचा सराव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:41 AM2024-10-14T09:41:32+5:302024-10-14T09:41:55+5:30
गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये शिवकुमार आणि कथित अल्पवयीन आरोपीला कुर्ला येथे सोडण्यात आले. तेथे दोघे वेगळ्याच व्यक्तीच्या नावे भाड्याच्या घरात राहत होते.
मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपी घरातच बंदूक चालविण्याचा सराव करीत होते, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासांत समोर येत आहे. आतापर्यंत त्यांना सुपारीचे दोन लाख रुपये पोहोच करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे.
गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये शिवकुमार आणि कथित अल्पवयीन आरोपीला कुर्ला येथे सोडण्यात आले. तेथे दोघे वेगळ्याच व्यक्तीच्या नावे भाड्याच्या घरात राहत होते.
१५ दिवसांपूर्वी मोहम्मद
झिशान अख्तर हा गुरमेलला घेऊन कुर्ला येथे आला. आरोपी घरातच बंदूक चालविण्याचा सराव करीत असल्याचेही तपासांत समोर आले आहे. या हत्या कटात आणखी कितीजण सामील आहेत, याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे.
शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार
बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तान परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सिद्दिकी यांच्या अंत्यदर्शनासाठी कब्रस्तानाबाहेर कार्यकर्ते व समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. तिरंग्यात लपेटण्यात आलेले सिद्दिकी यांचे पार्थिव बाहेर काढण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.