Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 09:16 AM2024-10-15T09:16:18+5:302024-10-15T09:17:22+5:30
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एका व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती.
अजित पवार गटाचे नेते नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा एका व्यक्तीच्या पायालाही गोळी लागली होती. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हत्या झाली 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?, आरोपींनी कसा गोळीबार केला? याबाबत या व्यक्तीने आता महत्त्वाची माहिती दिली आहे.
राज कनोजिया असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या २२ वर्षीय राज कनोजियाने सांगितलं की, तो टेलरचं काम करतो. घटनेच्या दिवशी दसरा असल्यामुळे तो सायंकाळी पाच वाजताच घरी गेला होता. त्यानंतर तो दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आला. दर्शन घेतल्यानंतर तो ज्यूस पिऊन घराकडे जात असताना एकच गोंधळ उडाला. दसरा असल्याने फटाकेही फोडले जात होते. तेव्हा राजला वाटलं की, त्याच्याही पायाला फटाक्यामुळे इजा झाली आहे.
राजने पायाकडे पुन्हा पाहिलं असता त्यातून खूप रक्त येत होतं. तिथे उपस्थित लोकांनी राजला लगेचच मंदिराच्या आत नेलं. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने राजला जवळच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे त्याच्या पायात गोळी लागल्याचं समोर आलं. याचवेळी राजला बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचीही माहिती मिळाली. सध्या राजच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
राजने दिलेल्या माहितीनुसार, तो फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहे. अशा स्थितीत इतक्या लवकर स्वत:च्या पायावर पुन्हा नीट उभं राहणं कठीण वाटतं आहे. त्यामुळे त्याने सरकारकडे मदत मागितली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन शूटर्सनी गोळीबार केला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तर इतरांच्या शोधात महाराष्ट्रासह अनेक राज्यात छापे टाकले जात आहेत.
१२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर लोक फटाके फोडत होते. त्यानंतर रात्री ९.२० च्या दरम्यान बाबा सिद्दिकी त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर आले. फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण अचानक आले आणि त्यांनी एकापाठोपाठ सहा राऊंड फायर केले. यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांना लागल्या.
गोळी लागताच बाबा सिद्दिकी जमिनीवर कोसळले. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता. यापैकी धर्मराज आणि गुरमेल यांना ताब्यात घेतलं होतं. तर झिशान, शुभम लोणकर आणि शिव कुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण आणि शुभम हे भाऊ आहेत.