बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 05:19 PM2024-10-13T17:19:41+5:302024-10-13T17:22:54+5:30
Baba Siddique News in Marathi: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एकाच आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.
Baba Siddique Murder Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन आरोपींनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडल्या. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने एकाच आरोपीची ७ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर दुसऱ्या आरोपीसंबंधात कोर्टाने पोलिसांना वेगळे आदेश दिले आहेत.
बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या आरोपीपैकी गुरमैल सिंह आणि आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. पण, न्यायालयाने आरोपी गुरमैल सिंह यालाच पोलीस कोठडी दिली. गुरमैल सिंह याला सात दिवसांची म्हणजे २१ ऑक्टोबरपर्यंतच पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दुसऱ्या आरोपीबद्दल न्यायालयाने काय दिले आदेश?
दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली नाही. त्याच्या वयाच्या मुद्द्यासंदर्भात कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने या आरोपीची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ऑसिफिकेशन टेस्टनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यास सांगण्यात आले आहे.
ऑसिफिकेशन टेस्ट काय असते?
आरोपीचे वय निश्चित किती आहे, हे जाणून घेण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट केली जाते. हाडांचा एक्स-रे, सीटी स्कॅन यांच्या माध्यमातून हाडांचा आकाराचे अभ्यास केला जातो आणि त्यावरून त्याचे वय किती आहे, याबद्दलचा रिपोर्ट दिला जातो.