अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला फेकले शौचालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 04:55 AM2019-12-14T04:55:37+5:302019-12-14T04:56:31+5:30
सायन रुग्णालयातील प्रकार, पोलिसांनी दोन तासांत घेतला आईचा शोध
मुंबई : सायन रुग्णालयाच्या सार्वजनिक शौचालयातील एका प्लास्टीक बकेटमध्ये नवजात बालक मिळाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अवघ्या दोन तासांत बाळाच्या आईचा शोध घेत, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या बाळ आणि आई दोघेही सायन रुग्णालयात आहेत. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाचा सांभाळ कसा करायचा यातून तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सायन रुग्णालयात अपघात विभागाशेजारी सार्वजनिक शौचालयातील प्लास्टीक बकेटमध्ये नवजात बालक सापडले. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास माहिती मिळताच सायन पोलीस तेथे दाखल झाले. बाळाला अतिदक्षता विभागात दाखल केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री सावंत यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बाळाच्या आईचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान एक महिला धावतच अपघात विभागाकडून शौचालयाकडे जाताना दिसली.
पोलिसांनी तोच धागा पकडून तपास सुरू केला. त्यात, महिलेने ज्या टॅक्सीतून रुग्णालयात प्रवेश केला त्या टॅक्सी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या मदतीने महिलेच्या घरापर्यंत पोहोचले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिचेच ते बाळ असल्याचे पोलिसांना सांगितले. मुलापासून सुटका करण्यासाठी त्याला फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. सध्या दोघांवरही सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळाला त्याची आई मिळाली.
भीतीने प्लास्टीक बकेटमध्ये दिले सोडून
महिला घटस्फोटित असून सलूनमध्ये नोकरी करते. ती शाहूनगरमध्ये राहते. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यातच ती गरोदर राहिली. याबाबत तिच्या घरच्यांना काहीही माहिती नव्हते. शुक्रवारी तिच्या पोटात दुखू लागले. तिने तत्काळ टॅक्सी घेत सायन रुग्णालय गाठले. पुढे अपघात विभागाबाहेर असलेली गर्दी पाहून तिने शौचालयात धाव घेतली. तेथेच मुलाला जन्म दिला. या बाळाला कुटुंब आणि समाज स्वीकारणार नाही या भीतीने बाळाला तेथेच एका प्लास्टीक बकेटमध्ये सोडून ती निघून आल्याचे पोलिसांना सांगितले.ंू