नागपुरात परत ‘पॉलिश गॅंग’ सक्रिय, सासू-सुनेला घातला गंडा
By योगेश पांडे | Published: February 9, 2024 05:03 PM2024-02-09T17:03:56+5:302024-02-09T17:04:15+5:30
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ५८ वर्षीय महिला व तिची सून गुरुवारी दुपारी घरीच होते.
नागपूर : भांडे व दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत गंडा घालणारी पॉलिश गॅंग परत सक्रिय झाली आहे. या टोळीच्या दोन सदस्यांनी सासू-सुनेची भर दिवसा फसवणूक केली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ५८ वर्षीय महिला व तिची सून गुरुवारी दुपारी घरीच होते. अचानक दोन काळ्या बॅग हाती घेतलेले व्यक्ती पोहोचले व आम्ही पितळी भांडे साफ करून देत असे सांगितले. महिलेच्या सुनेने घरातील पितळीचा गडवा दिला असता आरोपींनी तो साफ करून दिला. त्यानंतर चांदीचे चाळ दिले असता तेदेखील आरोपींनी लगेच साफ करून दिले. यामुळे महिलेच्या सुनेचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी ते दागिनेदेखील साफ करून देतात असे सांगितले. यावरून महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची पोत त्यांना दिली. आरोपींनी तिच्या सुनेला घरातून हळद आणण्यासाठी सांगितले.
आरोपींनी ते दागिने डब्यात आहे असे सांगितले व तो डबा गॅसवर ठेवण्यास सांगितले. महिला व सून स्वयंपाकघरात गेले असता आरोपी मूळ दागिने घेऊन फरार झाले. त्या डब्यात काहीच नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सासूसुनेने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.