बदलापूर प्रकरण :आराेपी अक्षय शिंदे याच्या पोलिस कोठडीत वाढ
By मुरलीधर भवार | Published: September 5, 2024 04:41 PM2024-09-05T16:41:18+5:302024-09-05T16:42:00+5:30
आणखीन तीन दिवस पोलिस कोठडी
कल्याण-बदलापूर येथील शिशू वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंंदे याला आज पुन्हा कल्याम जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. त्याला आणखीन तीन दिवसांची पोलिस काेठडी सुनावली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत त्याची पोलिस कोठडी असून त्याला पुन्हा तीन दिवसांची न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सरकारी वकील अश्वीनी भामरे पाटील यांनी सांगितले की, पोलिसांना तपास कामी आरोपी अक्षय शिंदे याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. त्याच्या मोबाईल विषयी माहिती देण्यास तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत आहे. त्याच्याकडून अद्याप त्याच्या मोबाईल विषयीची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही. या शिवाय काही पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या होत्या. व्यवस्थापनातील दोन जणच आरोपी
असल्याने पुढील तपासकरीता क्लू मिळत नाही. त्यामुळे पोलिस कोठडीत वाढवून द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने या मागणीचा विचार करीत तपासाकरीता पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. शिशू वर्गात शिकणाऱ््या दोन चिमुकल्या मुलींवरील लैगिंक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आल्यावर त्याला प्रथम २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्याला २६ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. ही कोठडी एका मुलीच्या गुन्ह्या प्रकरणी देण्यात आली होती. दुसऱ्या मुलीच्या लैगिंक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असात त्याला न्यायालयीन कोठडी दिली गेली होती. यावेळी पोलिसांनी तपासकामी पुन्हा पोलिस कोठडी घेण्याचा हक्क राखून ठेवला होता. त्यानुसार आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. ही पोलिस कोठडी संपुष्टात आल्यावर त्याला आज परत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसाची वाढ केली आहे. आरोपी अक्षय शिंदे हा त्याच्या मोबाईलची माहिती पोलिसाना देत नाही. तर त्याचा मोबाईल नेमका कुठे आहे. तो कोणाकडे आहे. आरोपीने त्याच्या मोबाईलची विल्हेवाट लावली आहे का ? या विविध अंगाने एसआयटी आणि पोलिसांकडून तपास सुरु आहे.