मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:00 PM2024-09-24T13:00:03+5:302024-09-24T13:12:02+5:30
या चकमकीत ३ पोलीस जखमी असल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितले. आता या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली आहे.
मुंबई - बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये आता विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. कुणाला तरी वाचवण्यासाठी सरकारने हे एन्काउंटर घडवून आणलं असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र अक्षयकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वरक्षणार्थ पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो ठार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. १० मिनिटांच्या या चकमकीत नेमकं काय घडलं हे जाणून घेणे गरजेचे आहे.
१३ ऑगस्ट २०२४ ला बदलापुरातील एका शाळेत २ अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आले. याच शाळेतील सफाई कामगार असलेल्या अक्षय शिंदेवर आरोप झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणामुळे लोकांमध्ये संताप होता. बदलापूर रेल्वे स्टेशनवर जमावाने ट्रेन रोकोही केला. त्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही ठिकाणी झटापटही झाल्याचे दिसून आले. बलात्कारातील आरोपी अक्षयला पोलिसांनी कोर्टासमोर हजर करत रिमांड घेतली होती.
सोमवारी या प्रकरणी आरोपी अक्षयला पोलीस जेलमधून चौकशीसाठी नेत होते. त्यावेळी अक्षयनं सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या कमरेला लावलेली बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यात प्रत्युत्तरात अक्षय शिंदे मारला गेला. मुंब्रा बायपास येथून जाताना अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरेकडून शासकीय बंदूक हिसकावली. त्यानंतर अक्षयने निलेशवर ३ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी निलेशला पायला लागली तर इतर २ गोळ्या हवेत मारल्या गेल्या. गोळी लागल्याने निलेश मोरे आणि अक्षय दोघेही जखमी झाले.
आरोपी अक्षय शिंदे आणि २ पोलीस हवालदारांसह एपीआय निलेश मोरे पोलीस व्हॅनच्या मागील बाजूस बसलेले होते. पुढे चालक आणि पोलीस निरिक्षक संजय शिंदे बसले होते. अक्षयला पोलिसांना शिवीगाळ करत होता असं पोलिसांचे म्हणणं आहे. निलेश मोरेकडील बंदूक हिसकावून अक्षयने गोळीबार केला त्यानंतर संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी अक्षयच्या दिशेने गोळी मारली. ही गोळी अक्षयच्या चेहऱ्याला लागली त्यात त्याचा मृत्यू झाला.
पोलीस वाहनात कोण कोण होते?
जेव्हा अक्षयने गोळीबार केला तेव्हा पोलीस वाहनात ४ जण होते, त्यात २ अधिकारी आणि २ पोलीस शिपाई होते. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक तपासात अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरेंच्या दिशेने गोळी झाडली त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या चकमकीत ३ पोलीस जखमी असल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितले. आता या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली आहे.
अक्षयच्या घरच्यांचा पोलिसांवर आरोप
पोलिसांनी बनाव रचून अक्षयला गोळी झाडून मारले, सोमवारी या घटनेच्या आधी आम्ही अक्षयला भेटायला गेलो होतो. त्यावेळी तो माझ्यावर चार्जशीट दाखल झालीय असं सांगितले. लवकरच तो सुटेल असं मी त्याला बोलली. अक्षय फटाके फोडायलाही घाबरतो, मग बंदूक कसं चालवू शकतो असा सवाल करत अक्षयच्या आईने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.