गेमच्या नादात बदलापूरची मुलगी प. बंगालला पोहोचली; पोलिसांनी मित्राला अटक केली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 09:15 AM2022-02-12T09:15:50+5:302022-02-12T09:20:28+5:30

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या दोन वर्षांपासून फ्री फायर या मोबाइल गेमिंग ॲपचा नाद लागला होता

Badlapur's daughter Reached Bengal due to Online Game; Police arrest friend | गेमच्या नादात बदलापूरची मुलगी प. बंगालला पोहोचली; पोलिसांनी मित्राला अटक केली

गेमच्या नादात बदलापूरची मुलगी प. बंगालला पोहोचली; पोलिसांनी मित्राला अटक केली

googlenewsNext

अंबरनाथ : मोबाइल गेमच्या नादी लागून एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत घर सोडून थेट पश्चिम बंगालला पोहोचली. मात्र, घरच्यांनी तिचे अपहरण केल्याची तक्रार केल्याने ती पश्चिम बंगालला पोहोचताच पोलीस तिच्या स्वागतासाठी स्टेशनवर उभे ठाकले. एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा तपास उल्हासनगर क्राईम ब्रॅंचने करून तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या तिच्या मित्राला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या दोन वर्षांपासून फ्री फायर या मोबाइल गेमिंग ॲपचा नाद लागला होता. याच गेमिंग ॲपवर तिची पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात राहणाऱ्या एस. के. बुद्धू या २२ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. त्यातूनच कधीच प्रत्यक्षात भेट न झालेल्या या दोघांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ही मुलगी क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, तिथून तिने थेट कल्याण स्टेशन गाठले. तिथे तिचा मित्र एस. के. बुद्धू याच्यासह कर्मभूमी एक्स्प्रेस पकडून हे दोघे बंगालला रवाना झाले. 

इकडे मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. यानंतर उल्हासनगर क्राईम ब्रॅंचनेही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. ज्यात मुलीच्या मोबाइल लोकेशनननुसार ती कल्याण रेल्वेस्थानकावर असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार सीसीटीव्ही आणि रिझर्वेशन चार्ट तपासला असता, ती कर्मभूमी एक्स्प्रेसने बंगालला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या गाडीचे लाईव्ह लोकेशन घेऊन पोलिसांनी पश्चिम बंगालच्या रेल्वे पोलिसांना संपर्क साधून हुगळी जिल्ह्यातील डानकुणी रेल्वेस्थानकावर या दोघांनाही उतरवून घेतले. यानंतर मुलीचे कुटुंबीय आणि क्राईम ब्रँचचे पोलीस यांनी विमानाने जाऊन या दोघांना परत आणले. यापैकी मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले असून तिचा प्रियकर बुद्धू याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. 

पालकांच्या चिंतेत वाढ
बदलापूर शहरात यापूर्वीही डिसकॉर्ड नावाच्या मोबाइल गेमच्या नादी लागून एका १३ वर्षांच्या मुलाने घर सोडून गोवा गाठले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

Web Title: Badlapur's daughter Reached Bengal due to Online Game; Police arrest friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.