ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबवणाऱ्या 'थैली गँग'चा पर्दाफाश! चोरीचे तब्बल १५ मोबाईल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 09:08 PM2023-04-10T21:08:38+5:302023-04-10T21:09:21+5:30
ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबवणार्या झारखंडच्या 'थैली गँग'चा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
जळगाव : जळगावसह अकोला, नाशिक, खामगाव, भुसावळ येथील भाजी बाजारात फिरून ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबवणार्या झारखंडच्या 'थैली गँग'चा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, पोलिसांनी थैली गँगच्या दोन अल्पवयीन मुलांसह तुफान रघू रिखीयासन (३०, रा. पुरानाभट्टागाव, जि.साहेबगंज, झारखंड) व बारिश अर्जुन महतो (३५, रा. महाराजपुर नया टोला कल्याणी जि. साहेबगंज झारखंड) यांना अकोला येथून अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल चोरीचे १५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
दादावाडी येथील लखीचंद वामन बडगुजर हे शुक्रवारी मोबाईल दुरुस्त करण्यासाठी सोमाणी मार्केटमध्ये जात होते. पिंप्राळा बाजार रस्त्यावर चार अनोळखी युवकांनी बडगुजर थांबवून त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून मोबाईल हिसकाविला होता. मात्र, बडगुजर यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीन जणांना पाठलाग करून पकडले होते. पण, एक पसार झाला होता. तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी तिघांची कसून चौकशी केली. नंतर पळून गेलेला साथीदार हा अकोला येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अकोला गाठून तुफान रघू सिखीयासन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्याने टोळीतील दुसरा साथीदार बारिश अर्जुन महतो या संशयिताच्या शेगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथून १३ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले.
पिशविचा आधारघेत अलगद काढायचे मोबाईल...
झारखंडच्या या थैली गँगने जळगावसह अकोला, नाशिक, खामगाव, भुसावळ या ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात मोबाईल लांबविले असून त्यांची टोळी अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गावातील बाजारांमध्ये झारखंडची थैली गँग हातात पिशवी घेवून शिरत होती. गर्दीचा फायदा घेवून ते अल्पवयीन मुलांच्या मदतीने ग्राहकाच्या खिशाजवळ हातातील पिशवी घेवून जात अलगद मोबाईल काढून घेत तेथून पोबारा करीत होते. या गँगने संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला होता. त्यांच्याकडून आणखी काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीदास गभाले, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, रेवानंद साळुंखे, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकात पाटील, अतुल चौधरी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी यांच्या पथकाने केली.