टपाल कार्यालयातून पैशांची पिशवी चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:52 AM2020-07-11T02:52:34+5:302020-07-11T02:52:49+5:30
मुंबई : चेंबूरच्या पोस्ट कार्यालयाच्या काउंटरबाहेरून ७० वर्षीय गोप रामचंद दयानी यांची पैशांची कापडी पिशवी चोरीला गेली आहे. त्या ...
मुंबई : चेंबूरच्या पोस्ट कार्यालयाच्या काउंटरबाहेरून ७० वर्षीय गोप रामचंद दयानी यांची पैशांची कापडी पिशवी चोरीला गेली आहे. त्या पिशवीत ५२ हजार रुपये होते. कोरोनामुळे आधीच उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असताना, या चोरीमुळे त्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चेंबूर परिसरात पत्नी, मुलगा, सुनेसोबत राहणारे दयानी पोस्ट कार्यालयात दलाल म्हणून काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून घरखर्च भागवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे चेंबूरच्या पोस्ट कार्यालयात गेले. त्यांच्याकडे असलेल्या कमिशनसह ग्राहकांचे असे एकूण ९२ हजार रुपये होते. यातील ४५ हजार त्यांनी ग्राहकांना दिले. ४७ हजार रुपये पिशवीत होते. याच दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास पोस्ट कार्यालयात संगणक दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीला चार्जर हवा असल्याने त्यांनी पैशांची पिशवी तेथेच ठेवून, शेजारीच असलेल्या घरी चार्जर आणायला गेले. चार्जर घेऊन परत आले तेव्हा पोस्ट कार्यालयातील काउंटरवर बाहेरच्या बाजूला ठेवलेली पिशवी दिसून आली नाही. त्यांनी सगळीकडे शोध घेतला; मात्र पिशवी मिळाली नाही. या प्रकारामुळे कार्यालयात खळबळ उडाली. अखेर, संध्याकाळी त्यांनी चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
सीसीटीव्हीमध्ये दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून येत असल्याचे दयानी यांनी नमूद केले. तसेच यात त्यांची महत्त्वाची कागदपत्रेदेखील चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.
कमिशनचे होते पैसे
चेंबूर परिसरात पत्नी, मुलगा, सुनेसोबत राहणारे दयानी पोस्ट कार्यालयात दलाल म्हणून काम करतात.गुरुवारी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे चेंबूरच्या पोस्ट कार्यालयात गेले. त्यांच्याकडे असलेल्या कमिशनसह ग्राहकांचे असे एकूण ९२ हजार रुपये होते.