बहाद्दूर विद्यार्थिनीने पाठलाग करून मोबाइल चोरट्याला पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 04:07 PM2018-09-28T16:07:22+5:302018-09-28T16:53:27+5:30

जयश्रीचा मोबाइल हिसकावून चालत्या लोकलमधून सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर भामट्याने उडी घेतली. मात्र, प्रसंगावधानाने जयश्रीने देखील लोकलमधून उडी घेत चोरट्याचा चोर चोर ओरडत पाठलाग केला आणि इतर प्रवाशांच्या मदतीने चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

Bahadur students pursued and caught the mobile chorus | बहाद्दूर विद्यार्थिनीने पाठलाग करून मोबाइल चोरट्याला पकडले 

बहाद्दूर विद्यार्थिनीने पाठलाग करून मोबाइल चोरट्याला पकडले 

Next

मुंबई - लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या चोरट्याने एका विद्यार्थिनीच्या हातातील मोबइल हिसकावून चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. या विद्यार्थिनीने पाठलाग करून चोरट्याला इतर प्रवाशांच्या मदतीने पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा महिला डब्यात सुरक्षेसाठी एकही रेल्वे पोलीस नव्हता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जयश्री मिस्त्री असं या बहाद्दर, जिगरबाज विद्यार्थिनीचे नाव आहे. ती वाडीबंदर परिसरातील चिचबंदर येथे आपल्या कुटुंबासह राहते. 

१७ वर्षांची जयश्री विलेपार्ले येथील एका कॉलेजात शिकते. कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा सराव सुरू असल्याने तिला मागील काही दिवसांपासून घरी येण्यास उशीर होतो. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसटीच्या दिशेने जाणार्‍या लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करीत होती. डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकात महिला डब्यात या विद्यार्थिनीला एकटं  पाहून एक तरुण डब्यात चढला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला. नंतर जयश्रीचा मोबाइल हिसकावून चालत्या लोकलमधून सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर भामट्याने उडी घेतली. मात्र, प्रसंगावधानाने जयश्रीने देखील लोकलमधून उडी घेत चोरट्याचा चोर चोर ओरडत पाठलाग केला आणि इतर प्रवाशांच्या मदतीने चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

अचानक घडलेल्या या प्रकाराने ती विद्यार्थीनी हादरून गेली. तिनेही आपला रुद्रावतार दाखवला. तरीही चोरट्याने झटापट करत जयश्रीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याने चालत्या गाडीतून सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. प्रसंगावधान राखून विद्यार्थीनीनेदेखील चालत्या गाडीतून उडी घेत त्याचा पाठलाग सुरू केला. हा प्रसंग अक्षरश: अचंबित करणारा होता. पाठलाग करताना ती चोर.. चोर.. ओरडत होती. तिच्या या आकांताने फलाटावरील प्रवासीही सावरले आणि तिच्यासह त्यांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला. सगळ्यांनी त्या चोरट्याला पकडून फटकावले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हसीब अख्तर शेख (वय-20) असं  ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो मालाड येथे राहणारा आहे. वडाळा रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी दिली.

Web Title: Bahadur students pursued and caught the mobile chorus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.