धक्कादायक! उत्तर प्रदेशात आणखी एका मुलीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 08:05 AM2020-10-01T08:05:27+5:302020-10-01T08:24:42+5:30
Crime News : एका २२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
बलरामपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. यातच आता पुन्हा उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
येथील दोन मुलांनी मैत्रीच्या बहाण्याने मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी या मुलीला कंबर आणि पाय मोडलेल्या गंभीर अवस्थेत रिक्षातून घरी पाठवले. यानंतर तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका आरोपीचे नाव शाहिद आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीमध्ये राहणारे आहेत. या प्रकरणात तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केल्याचे बलरामपूर पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पीडितेचे हात, पाय आणि कंबर तोडल्याची बाब योग्य नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याची पुष्टी झालेली नाही.
पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गैंसडी कोतवाली परिसरातील आहे. बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी पचपेडव्याच्या महाविद्यालयात गेला होती.
सायंकाळी एका रिक्षाचालकाने मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घराजवळ सोडले. कुटुंबीयांनी मुलीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. महाविद्यालयातून परतत असताना मुलीचे अपहरण करण्यात आले आणि गैंसडी शहरातील एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ज्या खोलीत पीडितवर सामूहिक बलात्कार झाला ती एका किरणा दुकानाची मागची बाजू आहे. किराणा दुकान चालवणारा तरुण या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. सामूहिक बलात्कारानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने आरोपींनी एका खासगी डॉक्टराला तिच्यावर उपचार करण्यासाठी बोलावले होते. पण डॉक्टराने खोलीत एकटे पडलेले पाहून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि तिच्या घरच्यांना कळवण्यास सांगितले.
दरम्यान, पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात पीडितेवर गैंसडीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच, याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.