बाद नाेटांचा अजूनही गैरमार्गाने हाेताेय वापर, ३५ टक्के माेबदला; जुने चलन बदलून देणाऱ्या टाेळीतील सदस्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 06:12 AM2021-10-29T06:12:17+5:302021-10-29T06:12:39+5:30
Note Ban : तब्बल ३५ लाख रुपये मूल्य असलेल्या जुन्या नाेटा त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ५ वर्षांपूर्वी नाेटाबंदी जाहीर करून ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नाेटा बाद केल्या हाेत्या. मात्र, अजूनही या नाेटांचा वापर गैरमार्गाने करण्यात येत आहे. बेंगळुरूमध्ये दाेन कापड व्यापाऱ्यांसह ५ जणांना चलनातून बाद झालेल्या नाेटांसह अटक करण्यात आली आहे.
तब्बल ३५ लाख रुपये मूल्य असलेल्या जुन्या नाेटा त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. सुरेश कुमार आणि रामकृष्ण या ३२ वर्षीय कापड व्यापाऱ्यांसह दयानंद आणि मंजूनाथ नावाचे शेतकरी आणि व्यंकटेश नावाच्या एका कंत्राटदाराला एचबीआर लेआउटमधून अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या नाेटा ३५ माेबदला घेऊन बदलून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
याप्रकरणात एकूण ८० लाख रुपयांच्या बाद झालेल्या नाेटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ५ काेटी रुपयांचे मूल्य असलेल्या बनावट नाेटाही जप्त करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कुमार आणि रामकृष्ण हे मुख्य आराेपी आहेत. त्यांनी व्यंकटेश, मंजूनाथ आणि दयानंद यांना जुन्या नाेटा बदलून ३५ टक्के माेबदला देण्याचे आश्वासन दिले हाेते. हे १० ऑक्टाेबरला जुन्या नाेटा बदलण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांच्या नाेटा जप्त करण्यात आल्या. (वृत्तसंस्था)
जुन्या नाेटा बदलून देणारे एक माेठे रॅकेट असून त्याची पाळेमुळे केरळपर्यंत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. केरळमध्ये एक टाेळी जुन्या नाेटांची खरेदी करते. एका फार्महाउसमध्ये सर्व नाेटा जमा करून ठेवल्याची माहिती आराेपींनी पाेलिसांना दिली आहे. त्यावरून पुढील कारवाई सुरू आहे.