दणका! विजय मल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
By पूनम अपराज | Published: December 6, 2020 05:56 PM2020-12-06T17:56:25+5:302020-12-06T17:57:38+5:30
Vijay Mallya : हे कर्ज फेडण्याऐवजी २०१६मध्ये त्याने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला फरार देखील घोषित करण्यात आले आहे.
कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याची फ्रान्समधील १.६ मिलियन युरोची म्हणजे १४ कोटींची संपत्ती हस्तगत केली आहे. किंगफिशर एअरलाईन्ससाठी आफरातफर करून १० हजार कोटींचं कर्ज घेतल्याचा मल्ल्यावर ठपका आहे. हे कर्ज फेडण्याऐवजी २०१६मध्ये त्याने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला फरार देखील घोषित करण्यात आले आहे.
विजय मल्ल्याची ही मालमत्ता फ्रान्स येथील 32 Avenue FOCH ( एव्हेन्यू फोच) या पत्त्यावर नोंद होती. ईडीने कारवाई करून ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. या मालमत्तेची किंमत १४ कोटी इतकी आहे. ही कारवाई केल्यानंतर ईडीने ट्विट करून तशी अधिकृत माहितीही दिली आहे. ईडीने २५ जानेवारी २०१६ रोजी किंगफिशर एअरलाईन्स, विजय मल्ल्या आणि इतरांविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयारच्या आधारे पीएमएलए ऍक्ट, 2002 (PMLA) अंतर्गत चौकशी सुरू केली होती. फ्रान्समधील तपास यंत्रणांच्या मदतीने ईडीने त्याचा फ्रान्सस्थीत एक फ्लॅट जप्त केला आहे. कोट्यवधींच्या असणाऱ्या या फ्लॅट जप्तीनंतर मल्ल्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ED seizes asset worth 1.6 Million Euros through French authority located at 32 Avenue FOCH, France of Vijay Mallya under PMLA in a #BankFraudCase
— ED (@dir_ed) December 4, 2020