चोरांनी सोनं-चांदी नाही तर चोरले 'केस'; किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:24 IST2025-03-08T14:24:03+5:302025-03-08T14:24:27+5:30
चोर सोने-चांदी घेऊन नाही तर केस घेऊन पळून गेले आहेत.

चोरांनी सोनं-चांदी नाही तर चोरले 'केस'; किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का
बंगळुरूमधून एक अजब घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे चोर सोने-चांदी घेऊन नाही तर केस घेऊन पळून गेले आहेत. लक्ष्मीपुरा क्रॉस येथील एका गोदामातून ही चोरी झाली. हे केस विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगितलं जातं.
द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, २८ फेब्रुवारी रोजी, बंगळुरूच्या लक्ष्मीपुरा क्रॉस येथील एका गोदामातून दरोडेखोरांच्या टोळीने १ कोटी रुपये किमतीचे ८३० किलो केस चोरले. रिपोर्टनुसार, ७३ वर्षीय वेंकटस्वामी के. केसांचा व्यवसाय करतात. त्यांनी आपला स्टॉक हेब्बलहून लक्ष्मीपुरा क्रॉसला ट्रान्सफर केले. येथे केस विक्रीसाठी २७ बॅगमध्ये ठेवण्यात आले होते.
चोरीच्या घटनेनंतर वेंकटस्वामी यांनी पोलिसात तक्रार केली. मध्यरात्रीनंतर सहा गुन्हेगारांचा एक गट महिंद्रा बोलेरो एसयूव्हीमधून गोदामात पोहोचला. त्यांनी शटर उघडण्यासाठी लोखंडी सळ्या वापरल्या. यानंतर, त्यांनी बाहेरून केसांच्या पिशव्या काढल्या आणि त्या त्यांच्या गाडीत घेऊन पळून गेले.
चोरी झाल्यानंतर, एका स्थानिक रहिवाशाने काही लोकांना बॅगा घेऊन जाताना पाहिले. याशिवाय बॅग लोड करताना चोर तेलुगूमध्ये बोलत होते. त्यामुळे रहिवाशांना वाटलं की हे काम नियमितपणे केले जात आहे. दुसऱ्या एका वाटसरूला रस्त्यावर केसांचे ढिगारे विखुरलेले दिसले, ज्यामुळे त्याचा संशय बळावला. काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच त्याने ताबडतोब पोलीस हेल्पलाइनवर फोन केला आणि पोलिसांना कळवलं.