गुन्हेगारानं का केले महालक्ष्मीचे ५९ तुकडे?; २३ दिवसातील 'त्या' घटनांचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:33 PM2024-09-26T13:33:27+5:302024-09-26T13:38:12+5:30

बंगळुरूतील महालक्ष्मी हत्याकांडाने राज्यासह देशात खळबळ उडाली, हत्येनंतर महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तब्बल ५९ तुकडे मारेकऱ्यांनी केले होते. 

Bangalore Mahalakshmi Murder Case - Why did the criminal cut Mahalakshmi into 59 pieces?; Know Whole incident happened in 23 days | गुन्हेगारानं का केले महालक्ष्मीचे ५९ तुकडे?; २३ दिवसातील 'त्या' घटनांचा उलगडा

गुन्हेगारानं का केले महालक्ष्मीचे ५९ तुकडे?; २३ दिवसातील 'त्या' घटनांचा उलगडा

बंगळुरू - ३ सप्टेंबरची रात्र, कर्नाटकच्या बंगळुरुचा व्यालिकावल परिसर...याठिकाणी एका फ्लॅटमध्ये २९ वर्षीय महालक्ष्मीची निर्दयी हत्या करण्यात आली. कुणालाही भनक लागणार नाही यारितीने अत्यंत क्रूरपणे हा प्रकार घडला. पुढे सर्वकाही व्यवस्थित सुरु होते, मात्र अचानक शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून महालक्ष्मीची आई आणि बहीण तिच्या राहत्या घरी पोहचतात. याठिकाणी घरचा दरवाजा उघडतात तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. 

खोलीत रक्ताचे डाग, मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे व इतर वस्तू विखुरलेल्या होत्या. तिथे उभे राहणेही कठीण होईल एवढी दुर्गंधी होती. फ्रिजजवळ रक्ताचे डाग त्यांच्या डोळ्यांना दिसतात. आई फ्रीजकडे जाते आणि दरवाजा उघडताच जोरदार किंचाळते. आतमध्ये मानवी शरीराचे ३० ते ४० तुकडे होते तर खालच्या बाजूस महालक्ष्मीचे कापलेले मुंडकं होते. आईचा आरडाओरडा ऐकून बाकीचे लोक तिथे पोहोचले, त्यानंतर याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

महालक्ष्मीच्या घराबाहेर गर्दी जमली तेवढ्यात पोलीस तेथे पोहोचले. त्या खोलीत स्वतः पोलीस उभे राहू शकले नाहीत इतका वास खूप वाईट होता. तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. हे भीषण दृश्य पाहून ते लोकही घाबरले. पोस्टमॉर्टम हाऊसमधून काही लोकांना मदतीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांना मृतदेहाचे एकूण ५९ तुकडे सापडले. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला. महालक्ष्मीचा खून करणारा कोण होता? हेच उत्तर सगळ्यांना हवं होतं.

आईचा पोलिसांना जबाब

पोलिसांनी आईची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले, आम्ही मूळचे नेपाळमधील टिकापूर भागातील रहिवासी आहोत. मी ३५ वर्षांपूर्वी माझे पती चरणसिंह यांच्यासोबत बंगळुरुला शिफ्ट झाले. आम्ही इथे कामासाठी आलो.  काही काळाने आम्हाला जुळ्या मुली झाल्या. महालक्ष्मी आणि लक्ष्मी असं नाव दिलं. त्यानंतर उक्कम सिंह आणि नरेश हे दोन पुत्र झाले. महालक्ष्मीचा विवाह नेलमंगला परिसरात राहणाऱ्या हेमंत दाससोबत झाला होता.

पती हेमंतपासून विभक्त

हेमंत मोबाईल दुरुस्तीचं दुकान चालवायचा तर महालक्ष्मीही एका मॉलमधील ब्युटी सेंटरमध्ये काम करू लागली. दोघांना एक मुलगी होती. पण २०२३ मध्ये महालक्ष्मी आणि हेमंत यांच्यात दुरावा आला. दोघे वेगळे झाले. महालक्ष्मी एकटी व्यालिकावल परिसरात येऊन राहू लागली. आई नेहमी १५ ते २० दिवसांतून एकदा महालक्ष्मीला भेटायला यायची. पण महालक्ष्मीचा फोन बंद झाल्याने कुटुंब चिंतेत होते. त्यानंतर दुसऱ्या मुलीला घेऊन आई महालक्ष्मीच्या घरी पोहचली. 

पती हेमंतनं पोलिसांना काय सांगितले?

या हत्याकांडात महालक्ष्मीचा पती हेमंत याचीही पोलिसांनी चौकशी केली. या सगळ्यामागे हेमंतचा हात असावा, असा संशय पोलिसांना होता. कारण महालक्ष्मी आणि त्यांचं एकमेकांशी पटत नव्हते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मीने पती हेमंतविरुद्ध मारहाणीची तक्रारही दाखल केली होती. मात्र हेमंतने पोलिसांना जे काही सांगितले ते पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. हेमंत म्हणाला की,  माझ्या पत्नीचे अशरफ नावाच्या हेअर ड्रेसरशी प्रेमसंबंध होते. अशरफ अनेकदा तिला घरी घेण्यासाठी आणि दुचाकीवरुन घरी सोडायला यायचा. त्याने महालक्ष्मीची हत्या केली असेल असं दावा केला.

पोलिसांचा तपास अशरफच्या दिशेने वळला

हेमंतनंतर आता पोलिसांचे संपूर्ण लक्ष अशरफकडे वळले. हेमंतच्या चौकशीनंतर पोलिसांनी अशरफचा शोध घेतला. अशरफ बेंगळुरू येथे कामावर होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याची बराच वेळ चौकशी करण्यात आली. त्याचा जबाब, गेल्या २० दिवसांतील त्याचे ठिकाण, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनंतर पोलिसांनी अशरफची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले.

यानंतर पोलिसांनी परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. २ सप्टेंबर रोजी रात्री दोन जण महालक्ष्मीच्या घरी स्कूटरवरून आल्याचे उघड झाले. मात्र, फुटेजमध्ये या दोघांचे चेहरे दिसत नव्हते. तपास असाच चालू राहिला. आता या हत्येत हेमंत किंवा अशरफ यांची कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट झाले. मग महालक्ष्मीचा इतक्या निर्घृणपणे खून करणारा तिसरा कोण होता? याचं उत्तर पोलीस शोधत होते.

पोलिसांचे पथक दिवसरात्र या प्रकरणाचा बारकाईने तपास करत होते. नंतर त्यांना एक सुगावा लागला. पोलिसांनी मारेकऱ्याच्या भावाचा शोध घेतला होता. पोलिस ज्या मारेकऱ्याचा शोध घेत होते, त्याचे कुटुंब मुंबईतच राहते. बंगळुरू पोलीस मारेकऱ्याच्या भावापर्यंत पोहोचले. मारेकऱ्याच्या भावाने पोलिसांना सांगितले की, महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर त्याच्या भावानेच आपल्याला महालक्ष्मीची हत्या केल्याचे सांगितले होते.

मुक्ती रंजननं केली आत्महत्या 

मुक्ती रंजन रॉय असे मारेकऱ्याचे नाव आहे. अखेर मुक्ती रंजन रॉय कोण होता आणि त्याने महालक्ष्मीची हत्या का केली? यावेळी तो कुठे आहे? हे सर्व प्रश्न पोलिसांना जाणून घ्यायचे होते. या प्रकरणाचा तपास आणखी तीव्र करण्यात आला. मुक्ती रंजन सध्या ओडिशात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक सतर्क झाले. त्यानंतर  २५ सप्टेंबर रोजी भद्रक शहरात पोलिसांना मुक्ती रंजन रॉय यांचा मृतदेह सापडला होता. मुक्तीने आत्महत्या केली होती. पोलिसांना आरोपीजवळ एक डायरी आणि मृत्यूची नोंद सापडली. मुक्ती रंजन हा फुंडी गावचा रहिवासी होता आणि बंगळुरूत एका कपड्याच्या दुकानात काम करत होता.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?

मुक्तीरंजनने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, मी ३ सप्टेंबर रोजी महालक्ष्मीची हत्या केली होती. त्या दिवशी मी महालक्ष्मीच्या घरी गेलो होतो. आमचा कशावरून तरी वाद झाला. तेव्हा महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला. मला हे आवडले नाही आणि रागाच्या भरात मी तिला मारले. त्यानंतर मी तिच्या शरीराचे ५९ तुकडे केले, फ्रीजमध्ये ठेवले आणि तेथून पळ काढला. लोकांना वास येऊ नये म्हणून मी खोली स्वच्छ करण्याचाही प्रयत्न केला. मला महालक्ष्मीचे वागणे अजिबात आवडले नाही. मला नंतर खुनाचा नक्कीच पश्चाताप झाला. कारण मी रागाच्या भरात जे काही केले ते चुकीचे होते. मला भीती वाटली म्हणून मी इकडे पळत सुटलो असं त्याने सांगितले.

१ दिवसापूर्वीच घरी आला होता

ओडिशातील फुंडी गावात राहणारा मुक्ती रंजन आदल्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबरला घरी आला होता. तो काही वेळ घरी थांबला आणि रात्री स्कूटीवरुन बाहेर निघाला. यावेळी तो लॅपटॉप घेऊन गेला आणि मात्र तो कुठे गेला हे कोणालाच माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी कुळेपाडा परिसरात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या मुक्ती रंजन रॉय यांच्या आत्महत्येप्रकरणी दुशिरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे बंगळुरू पोलिसांनी महालक्ष्मी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले.
 

Web Title: Bangalore Mahalakshmi Murder Case - Why did the criminal cut Mahalakshmi into 59 pieces?; Know Whole incident happened in 23 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.