उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:25 AM2024-05-22T10:25:06+5:302024-05-22T10:26:43+5:30

कोलकाता येथे मित्राच्या घरी खासदार राहिले होते, तिथून एकेदिवशी दुपारी घरातून बाहेर पडले ते पुन्हा आलेच नाहीत. 

Bangladesh MP Anwarul Azim who came to India for treatment is missing; Last location in Bihar, search underway | उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू

उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू

कोलकाता - बांग्लादेशमधील खासदार अनवारुल अजीम अनार मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या डिप्टी हायकमिशननं दिली. १२ मे रोजी उपचारासाठी हे खासदार कोलकाताला आले होते. बांग्लादेशच्या सत्ताधारी अवामी लीगचे खासदार अनार हे १३ मेपासून गायब आहेत. कोलकातातील उत्तरेकडील बारानगर भागात ते त्यांच्या मित्राच्या घरी आले होते. १३ मे रोजी ते कुणालाही तरी भेटायला बाहेर गेले आणि त्यानंतर पुन्हा परतलेच नाहीत.

खासदार मित्राने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी खासदाराच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन ट्रेस केले तर ते बिहारमध्ये आढळलं. बेपत्ता होण्याच्या २ दिवसांपर्यंत ते कुटुंबाच्या आणि पक्षातील नेत्यांच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही. १४ मे पासून त्यांचा मोबाईल बंद येतोय. मागील ८ दिवसांपासून बेपत्ता असले तरी त्यांच्या फोनमधून कुटुंबातील सदस्यांना काही मेसेज मिळाले त्यात ते नवी दिल्लीला गेल्याचं सांगितले आहे. या बांग्लादेशी खासदाराचा शोध घेण्यासाठी बंगाल पोलीस बिहार पोलिसांचीही मदत घेत आहे.

कोण आहे अनवारूल अजीम अनार?

अनवारूल अजीम अनार २०१४, २०१८ आणि २०२४ मध्ये अवामी लीगकडून जेनैदाह लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेत. खासदाराचे स्वीय सहाय्यक असलेले अब्दुर रऊफ यांच्या म्हणण्यांनुसार, ते ११ मे रोजी उपचारासाठी भारतात गेले होते. सुरुवातीचे २ दिवस ते कुटुंबाच्या संपर्कात होते. पक्षातील काही नेत्यांसोबतही त्यांचे बोलणं झालं होते. मंगळवारपासून त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही.

दरम्यान, बांग्लादेश उच्चायुक्तांनी ही माहिती पंतप्रधानांना कळवली आहे. त्यानंतर बांग्लादेश परराष्ट्र खात्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला बेपत्ता खासदारांबाबत संपर्क साधला आहे. या प्रकरणाची भारतीय परराष्ट्र खात्यानेही गंभीर दखल घेतली आहे. तर गेल्या २ दशकांपासून अनवारूल अजीम अनार यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. भारतात न्यूरोलॉजिस्ट यांना भेटायला ते आले होते. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होऊ शकतात असा सल्ला मी त्यांना दिला असं खासदारांचे मित्र गोपाळ विश्वास यांनी सांगितले. 

अजीम अनार हे दुपारी घरातून बाहेर पडताना संध्याकाळी परततो असं मित्राला सांगितले. परंतु रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. त्यानंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खासदार दुपारी १.४१ वाजता घरातून बाहेर गेले होते. पोलिसांच्या डायरीनुसार, अजीम अनार हे घरातून काही अंतरावर जात रेंटने कार घेतली त्यात सवार झाले होते. एका खास कामासाठी दिल्लीला जात आहे. तिथे पोहचल्यावर फोन करतो, तुम्ही फोन करण्याची आवश्यकता नाही असं अजीम यांनी व्हॉट्सअप मेसेज कुटुंबातील सदस्यांना पाठवला होता. 

Web Title: Bangladesh MP Anwarul Azim who came to India for treatment is missing; Last location in Bihar, search underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.