पाचशे मुलींची तस्करी करणारा बांग्लादेशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:19 PM2018-09-06T21:19:45+5:302018-09-06T21:20:22+5:30
सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे.
वसई - बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरूणांनी फसवणू वेश्याव्यवसायासाठी भारतात आणणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अखेर वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीने मागील वर्षभरात किमाना पाचशे मुलींची तस्करी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील ११ आरोपी अद्याप फरार आहेत.
मागील वर्षी पोलिासांनी वेश्याव्यवसायावर छापा टाकून चार मुलींची सुटका केली होती. या चार मुली बांग्लादेशी होत्या आणि त्यांना फसवून या व्यवसायात आणण्यात आले होते. तेव्हापासून मुलींना फसवून आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होती. मात्र, टोळीचा म्होरक्या सैदुल (वय ४०) पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाचे प्रमुख जितेंद्र वनकोटी, हितेंद्र विचारे यांच्या पथकाने सैदुलला अटक केली. सैदुल हा बांग्लादेशी नागरिक आहे. बांग्लादेशातल्या गरीब मुलींना भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना तो बेकायदेशीरपणे भारतात आणत असे आणि विविध ठिकाणी कुंटणखान्यात शरीर विक्री करण्यासाठी विकत असे.
सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे. तो त्यांना भारत बांग्लादेशाच्या सिमेवरून चोरट्या मार्गाने भारतात आणायचा आणि देशाच्या विविध भागात विकायचा. अल्पवयीन मुलगी असेल तर किमान १ लाख रुपये आणि इतर तरुणांनी ५० ते ६० हजारात विकायचा. यानंतरही दरमहिन्याला त्याला कुंटणखान्यातून या मुलींच्या मोबदल्यात ठराविक रक्कम मिळत असे. वसईत त्याच्याविरोधात ४ गुन्हे दाखल असून मुंबई, पुणे आदी ठिकाणी त्यांने मुली पुरविल्याचे पोलिसांना सांगितले. मागील वर्षभरात त्याने किमान ५०० मुलींना भारतात आणून विकले होते. या मुलींना शरीर विक्री करण्यास भाग पाडून कुंटणखान्यातून त्यांना दरमहा ५ हजार रुपये मिळायचे.