बांग्लादेशी महिला प्रकरण: रेश्मा खानच्या याच जन्मदाखल्यामुळे प्रकरण झाले 'ट्रिगर' !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 10:51 AM2021-12-15T10:51:29+5:302021-12-15T10:51:49+5:30
पश्चिम बंगालच्या शासकीय विभागाचे पडताळणीपत्रही 'लोकमत' च्या हाती. आता 'सीआययु' च्या कारवाईकडे पोलीस खात्याचे लक्ष
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: भारतीय पासपोर्ट बनविण्यासाठी भाजपचे पदाधिकारी शाहीन हैदर आझम यांची बांग्लादेशी असलेली दुसरी पत्नी रेश्मा खान हिने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आय ब्रँचचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरुलकर यांनी केला आहे. तिच्या जन्मदाखल्यामुळे तिच्यावर सर्वात आधी पोलिसांना संशय आला होता आणि हे प्रकरण 'ट्रिगर' झाले. हा दाखला आणि पश्चिम बंगालच्या शासकीय विभागाने दिलेला पडताळणी अहवाल 'लोकमत' च्या हाती लागला आहे, ज्यात त्यांच्याकडे खानच्या जन्मनोंदीचे काही रेकॉर्डच नसल्याचे उघड होत आहे. त्यानुसार गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) याप्रकरणी पुढे काय कारवाई करते? याकडे संपूर्ण पोलीस खात्याचे लक्ष लागले आहे.
कुरुलकर यांनी सीआययुला दिलेल्या जबाबानुसार, रेश्माची जन्मतारीख १६ फेब्रुवारी १९८९ असे नमुद केलेला आणि १९ जुलै १९९७ रोजी जारी करण्यात आलेला जन्मदाखला तिने पासपोर्ट मिळण्यासाठी दिला होता, जो पश्चिम बंगाल येथून जारी करण्यात आल्याचे दिसत होते.
मात्र त्यातील मजकुराच्या ठळक भागाची पाहणी केली असता वरील भाग स्टॅम्पचा आणि त्याखाली गाळलेल्या जागी हस्ताक्षरे दिसून आल्याने तो बोगस असल्याचा संशय त्यांना आला. या जन्म दाखल्याची पडताळणी पश्चिम बंगालच्या डिस्ट्रिक्ट रेकॉर्ड अँड कोपीइंग सेक्शन ,नॉर्थ २४ पारगनास बारसात येथील शासकीय अधिकाऱ्यांकडे केल्यावर त्यांच्याकडे रेश्मा खानच्या जन्मनोंदीचे रेकॉर्डच नसल्याची माहिती आय ब्रँचच्या पडताळणी पथकाला मिळाली.
सदर जन्मदाखला, त्याचे संबंधित विभागाकडून आलेले पडताळणी पत्र 'लोकमत' च्या हाती लागले आहे. तिने पासपोर्ट मिळविण्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांपैकी हा दाखला असल्याने तो बोगस असल्याचे उघड झाले आहे. याबाबत कुरुलकर यांना मोबाईल आणि मेसेज करत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. दरम्यान सीआययुचे याप्रकरणी पुढचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.