मर्सिडीजसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेत बँकेला ३४ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:22 AM2020-02-05T02:22:37+5:302020-02-05T06:27:01+5:30
फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई : मर्सिडीजसाठी बँकेला बनावट कागदपत्रे सादर करून ३४ लाखांना गंडविल्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालाडच्या एका नामांकित बँकेत हा प्रकार घडला आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आँगस्ट २०१७ मध्ये बँकेचे अधिकृत डी.एस.ए. गौरव असोसिएट्स यांच्यामार्फत बळीराम लोखंडे याने कुलीन धनानी यांना मर्सिडीज कार विकत घ्यायची असल्याने बँके कडे कर्जासाठी अर्ज केला. त्यानुसार, कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना कर्ज मंजूर केले.
त्यानुसार, बँकेच्या अधिकृत धोरणानुसार डी.एस.ओ. गौरव असोसिएट्स यांच्या खात्यावर ३५ लाख ८८ हजार ३२२ रुपए जमा करण्यात आले. सदर रक्कम ३५ लाख, ८८ हजार ३२२ रुपये यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर त्यांच्यामार्फत नमूद रक्कम कर्जदाराच्या कार मालकाच्या खात्यावर जमा करणे डी.एस.ओ.ची जबाबदारी असते. त्यानंतर कुलीन धनानी यास कार लोनचे हप्ते चालू झाल्यानंतर सुरुवातीचे ८३ हजार ८४१चे पाच हप्ते वेळेवर भरले. त्यानंतर मात्र हप्ते भरण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने त्यांना संशय आला.
त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात, कर्जप्रकरण डी.एस.ओ. गौरव असोसिएट्स यांच्यामार्फत आले असल्याने नमूद डी.एस.ओ.चे काम पाहणारे अनुप सिंग यांना संपर्क केला असता, कार लोन करणारी व्यक्ती त्यांच्या ओळखीची नसून, ती फाईल बळीराम हेगडेची असल्याचे समजले. त्यानुसार, त्यांनी बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात येताच, धनानीसह, बाळाराम हेगडे आणि अनुप सिंगविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.
यामध्ये नेमका कुणाचा किती सहभाग आहे? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.