कर्जासाठी सोन्याचे खोटे दागिने ठेऊन बँकेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:38 PM2023-02-25T17:38:20+5:302023-02-25T17:39:32+5:30
भाईंदर पोलीस ठाण्याजवळ इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा आहे.
मीरारोड - सोन्याचे खोटे दागिने बँकेत तारण ठेऊन बँके कडून ६ लाख ७९ हजारांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या खातेधारकावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पोलीस ठाण्याजवळ इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा आहे. पूर्वेच्या तलाव मार्गावरील राजेश्वरी इमारतीत राहणाऱ्या खातेधारक राजकुमार तिवारी याने जुलै २०२१ मध्ये सदर बँकेत २ सोन्याचे ब्रेसलेट व ६ सोन्याच्या चैन असे २१९ ग्रामचे दागिने तारण ठेवून बँकेतून ६ लाख ७९ हजारांचे कर्ज घेतले होते. दर सहा महिन्यांनी सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. बँकेचे नियुक्त सराफ इंदू वर्मा यांनी डिसेम्बर २०२२ मध्ये तिवारी यांच्या तारण दागिन्यांची तपासणी केली असता ते दागिने खोटे आढळून आले.
या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक इंदुभूषण रामदास यांनी फिर्याद दिल्यावर २३ फेब्रुवारी रोजी भाईंदर पोलिसांनी तिवारी वर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दागिने पडताळणी न करताच तारण ठेऊन कर्ज दिले व तब्बल दीड वर्षांनी दागिने खोटे आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .