अबब! लॉकर्समध्ये ९१ किलो सोने, ३४० किलो चांदी; कंपन्या ED च्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:02 AM2022-09-15T07:02:37+5:302022-09-15T07:03:05+5:30

मुंबईस्थित पारेख एल्युमिनेक्स नावाच्या कंपनीने एका सरकारी बँकेकडून २२९६ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीने ज्या कारणांसाठी कर्ज घेतले होते त्या कारणांसाठी कर्जापोटी प्राप्त रकमेचा वापर केला नाही.

Bank fraud: ED seizes over 430 kgs gold, silver after searches at private lockers | अबब! लॉकर्समध्ये ९१ किलो सोने, ३४० किलो चांदी; कंपन्या ED च्या रडारवर

अबब! लॉकर्समध्ये ९१ किलो सोने, ३४० किलो चांदी; कंपन्या ED च्या रडारवर

googlenewsNext

मुंबई : सुमारे २३०० कोटी रुपयांचे कर्ज थकवत बँकेला गंडा घातल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स या मुंबईस्थित कंपन्यांवर छापेमारी करत, ९१.५ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त केली आहे. या ऐवजाची किंमत ४८ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या आठवड्यात ईडीने ही कारवाई केली. जप्तीची कारवाई पूर्ण झाल्यावर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली.

ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईस्थित पारेख एल्युमिनेक्स नावाच्या कंपनीने एका सरकारी बँकेकडून २२९६ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीने ज्या कारणांसाठी कर्ज घेतले होते त्या कारणांसाठी कर्जापोटी प्राप्त रकमेचा वापर केला नाही. या उलट हे पैसे काही बनावट खात्यांतून (केवायसी नसलेल्या) तसेच काही बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्याशी व्यवहार दाखवत या पैशांचा अपहार केला. तसेच बँकेकडे या कर्जाची परतफेड केली नाही. याच प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. कंपनीने कर्जाची परतफेड न करता बँकेला गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने सहा एफआयआर दाखल करत  यापूर्वीच तपास सुरू केला आहे, तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही कंपनीने दोन बँकांना ३९० कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल तपास सुरू केला आहे. 

पारेख एल्युमिनेक्स संबंधित कंपन्यांवर झालेल्या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना काही लॉकर्सच्या चाव्या सापडल्या.या चाव्यांबद्दल संबंधितांना विचारणा केल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी खासगी लॉकर्स होते तिथे ईडीच्या अधिकाऱ्यांना नेले.तिथे ईडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल ७६१ लॉकर्स आढळून आले. तीन लॉकर्स हे रक्षा बुलियन कंपनीचे होते.यापैकी दोन लॉकर्समध्ये मिळून ९१.५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी आढळून आली, तर रक्षा बुलियन कंपनीच्या कार्यालयात १८८ किलो चांदी आढळून आली. हा सारा ऐवज ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. ही लॉकर्स जिथे आहेत तिथे आवक-जावक नोंदीचे रजिस्टर उपलब्ध नव्हते. नियमाप्रमाणे या लॉकर्सची केवायसी झालेली नव्हती, तसेच तिथे नियमानुसार आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरादेखील नव्हता.
 

Web Title: Bank fraud: ED seizes over 430 kgs gold, silver after searches at private lockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.