धक्कादायक! मास्क न घातल्यानं बँकेच्या गार्डनं ग्राहकावर झाडली गोळी; घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 03:00 PM2021-06-26T15:00:17+5:302021-06-26T15:02:01+5:30
ग्राहकावर गोळी झाडून सुरक्षा रक्षक त्याच्या शेजारीच उभा होता; ग्राहकाची पत्नी आक्रोश करत होती
बरेली: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मास्क न घातल्यानं बँकेच्या सुरक्षा रक्षकानं एका ग्राहकावर गोळी झाडली आहे. यानंतर सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. तर ग्राहकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरक्षा रक्षकाला माझ्या पतीच्या छातीत गोळी झाडायची. मात्र दैव बलवत्तर म्हणून ती जांघेत लागली, असा दावा जखमी ग्राहकाच्या पत्नीनं केला. बँक ऑफ बडोदाच्या शाखेत हा संपूर्ण प्रकार घडला.
सुरक्षा रक्षकानं झाडलेली गोळी लागताच ग्राहक राजेश राठोड जमिनीवर कोसळले. याची माहिती मिळताच त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली. राठोड यांना एका रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्याा त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 'सुरक्षा रक्षकानं माझ्या पतीला जबरदस्तीनं धक्का दिला आणि गोळी झाडली. मला तुझ्या छातीतच गोळी घालायची होती. पण मी पायावर मारत आहे, असं सुरक्षा रक्षकानं गोळी झाडताना म्हटलं', असा दावा राजेश यांच्या पत्नी प्रियंका राठोड यांनी केला.
Bank security guard opens fire at customer for not wearing mask in UP’s Bareilly#manshotinbank#bankofbaroda#Bareilly#UttarPradeshpic.twitter.com/VV2pUivKcp
— Umer Naseef (@UmerNaseef1) June 25, 2021
राठोड यांना गोळी लागल्याचं समजताच त्यांची मुलगी आणि पत्नीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोठ्या संख्येनं पोलिसदेखील पोहोचले. त्यांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली. चुकून गोळी झाडली गेल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. 'बँकेत ग्राहक आले होते. त्यांच्याकडे आधी मास्क नव्हता. त्यांनी मास्क आणायला सांगितलं, तर ते शिव्या देऊ लागले. त्यावेळी धक्काबुक्की झाली आणि माझ्याकडून चुकून गोळी झाडली गेली,' असं सुरक्षा रक्षक केशव कुमारनं पोलिसांना सांगितलं.