बँक व्यवस्थापकाला गंडा; एटीएमने दोन मिनिटांत सुमारे दोन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:20 AM2019-06-28T03:20:53+5:302019-06-28T03:21:04+5:30
एका नामांकित परदेशी बँकेच्या वरळी शाखेतील बँक व्यवस्थापकाच्या क्रेडिट कार्डातून अवघ्या दोन मिनिटांत पावणेदोन लाख रुपये काढल्याची धक्कादायक घटना वरळीत घडली.
मुंबई - एका नामांकित परदेशी बँकेच्या वरळी शाखेतील बँक व्यवस्थापकाच्या क्रेडिट कार्डातून अवघ्या दोन मिनिटांत पावणेदोन लाख रुपये काढल्याची धक्कादायक घटना वरळीत घडली. कार्ड स्वाइप करून १८ वेळा हे पैसे काढण्यात आले़ या प्रकरणी वरळी पोलिसांनी अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
अंधेरीतील रहिवासी असलेले योगेश बछवानी (४२) असे तक्रारदार व्यवस्थापकाचे नाव आहे. २८ मे रोजी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १० हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला. या संदेशाने त्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले.
कार्ड ब्लॉक होईपर्यंत अवघ्या दोन मिनिटांत त्यांच्या मोबाइलवर १८ संदेश धडकले. या संदेशांनी त्यांना धक्काच बसला. कोपरखैरणेच्या एका एटीएममधून त्यांच्या क्रेडिट कार्डच्या तपशिलाद्वारे १८ व्यवहारातून तब्बल १ लाख ८० हजार रुपये काढण्यात आले होते.
त्यांनी याबाबत आॅनलाइन तक्रार दिली. अखेर, १८ जून रोजी वरळी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कोपरखैरणे येथील एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतल्याची माहिती समजते.